मोहोळ : तालुक्यातील वाळूज (दे) येथील एका शेतकर्याच्या शेतातील टॅक्टरच्या लोखंडी औजारांची एक लाख सात हजार रुपयांची चोरी झाल्याची घटना 24 ते 28 जुलै दरम्यान घडली. याबाबत मोहोळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
वाळूज (दे) येथील शेतकरी नानासाहेब वाल्मिक मोटे यांची वाळूज शिवारात शेती आहे. दि.24 जुलै रोजी त्यांनी ट्रेक्टरच्या औजारांच्या सहाय्याने शेतातील कामे केली व ट्रॅक्टरसह लोखंडी नांगर,पंजीफाळ, सात दाती फन व रोटावेटर अशी अवजारे ट्रॅक्टर शेजारी ठेवून सायंकाळी घरी आले. त्यानंतर राजकोट येथून ऊस क्रेन हार्वेस्टर घेण्यासाठी 25 जुलै रोजी राजकोट येथे जाऊन दि.27 जुलै रोजी परत आले. सोमवारी ( ता. 28 ) मुलगा रणवीर हा शेतात गेला असता त्याला ट्रॅक्टरच्या मागील लोखंडी नांगर,पंजीफाळ, सात दाती फन व रोटावेटर ही अवजारे दिसून आली नाहीत.म्हणून त्याने वडीलांना फोन करून आपली अवजारे कोणा शेतकर्याला दिली आहेत का ? म्हणून फोन केला.त्यावेळी वडीलांनी मी कोणालाही अवजारे दिली नाहीत आजू बाजूच्या शेतकर्यांना विचारून बघण्यास सांगितले असता मुलाने शेजारील शेतकर्यांकडे चौकशी केली.
कोणीही शेतकर्याने अवजारे नेली नसल्याची खात्री झाली. चोरट्यांनी माझ्या शेतातील लोखंडी नांगर (किंमत 30 हजार रुपये),पंजीफाळ ( 15 हजार रुपये ), सात दाती फन( 12 हजार रुपये ) व रोटावेटर (50 हजार रुपये) असे एकूण एक लाख 7 हजार रुपयांची लोखंडी अवजारे चोरून नेली असल्याची तक्रार नानासाहेब मोटे यांनी सोमवारी (ता.28) मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या घटनेचा तपास हेड कॉन्स्टेबल विरभद्र उपासे करीत आहेत.