सोलापूर : राज्य शासनाने यंदाच्या खरीप व रब्बी हंगामासाठी एक रुपयातील पीक विमा योजना गुंडाळल्याने शेतकर्यांनी पीकविम्याकडे पाठ फिरविली आहे. आतापर्यंत केवळ 55 हजार शेतकर्यांनी खरिपातील पिकांसाठी पीक विमा उतरविला आहे. 31 जुलै ही पीक विम्याची अंतिम तारीख आहे.
तत्कालीन महायुती शासनाने एक रुपयात पीक विमा योजना सुरू केली होती. त्यामुळे बहुतांश शेतकर्यांनी कांदा, उडीद, तूर, सोयाबीन यासह अन्य पिकांसाठी पीक विमा उतरविला होता. परंतु यात अनेक गैरप्रकार उघडकीस आल्याने शासनाने रुपयातील पीक विमा योजना गुंडाळली आहे. एक जुलैपासून खरीप हंगामातील पीक विमा भरण्यास सुरुवात झाली. गत हंगामात एक रुपयात पीक विमा योजना असल्याने विमा भरणार्या शेतकरी संख्येत मोठी वाढ झाली होती. याशिवाय त्याअगोदरही विमा भरण्यासाठी एक व दोन टक्के रक्कम भरून विमा भरणार्या शेतकर्यांची संख्या लाखाच्या पटीत होती. परंतु यंदा मात्र शेतकर्यांनी पाठ फिरविली आहे.
राज्य शासनाच्या नियमानुसार पीक विमा भरण्यासाठी एक व दोन टक्के रक्कम शेतकर्यांना भरावी लागणार आहे. यंदा पीक कापणी प्रयोगातून निघालेल्या उत्पादनावर आधारित पीक विम्याची नुकसान भरपाई मिळणार आहे.
जिल्ह्यातील 115 मंडळात 55 हजार शेतकर्यांचे 78 हजार हेक्टरसाठी एक लाख दोन हजार अर्ज आले आहेत. शेतकरी हिश्याचे सहा कोटी 16 लाख रुपये जमा झाले असून केंद्र व राज्य हिस्सा प्रत्येकी 25 कोटी 15 लाख 16 हजार रुपये असे विमा कंपनीकडे 56 कोटी 47 लाख रुपये जमा होणार आहेत. 2 हजार अर्ज आले आहेत.
एक जुलैपासून यंदाच्या खरीप हंगामातील पिकांसाठी पीक विमा भरण्यास सुरुवात झाली आहे. ही मुदत 31 जुलैपर्यंत आहे. केवळ 2 दिवस शिल्लक राहिले आहेत.