सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील तिलाठी (इंगळगी) येथील रेल्वे गेटवर ओव्हरब्रिज व अंडरपास रस्त्याला मंजुरी मिळाली. या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या कामांची पाहणी खा. प्रणिती शिंदे आणि संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन केली आहे.
तिलाठी (इंगळगी) येथील रेल्वे गेट हा परिसरातील दहा ते पंधरा गावांतील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. दिवसभरात रेल्वेगेटवर अनेक नागरिकांची ये-जा होत असल्याने गेट वारंवार बंद ठेवावे लागते. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती.
ग्रामस्थांची अडचण लक्षात घेऊन खा. शिंदे यांनी सहा फेब्रुवारी 2026 रोजी रेल्वे विभागाकडे निवेदन सादर करून तिलाठी (इंगळगी) येथे रेल्वे ओव्हरब्रिज आणि अंडरपास रस्ता करण्याची मागणी केली होती. तिलाठी रेल्वेगेट वर ओव्हरब्रीज व अंडरपास रस्ता याबाबत सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात येत होता. या पाठपुराव्याला यश मिळाले असून, रेल्वे विभागाकडून या कामास मंजुरी देण्यात आली आहे.
यावेळी रेल्वे गती शक्ती विभागाचे मंडल अभियंता आशिष साहू, नॅशनल हायवे विभागाचे कार्यकारी अभियंता अनिस खैरदी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे उपस्थित होते.