बार्शी : गत काही दिवसापासून नजरेआड गेलेल्या त्या वाघ सदृश्य वन्य प्राण्यांने पुन्हा डोके वर काढले आहे. शनिवारी पांढरी येथील गोरोबा पाटील या शेतकर्याच्या शेतातील दोन जनावरांचा फडशा पाडून एका वासराला जखमी केले होते. पुन्हा दुसर्या दिवशी उक्कडगाव शिवारात एका शेतकर्याच्या कळपातील वासरावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले आहे.
बिभीषण संदीपान दराडे हे उक्कडगाव शिवारात खडखडी भागात राहतात. त्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून जनावरे साभाळली आहेत. वाघसदृष्य प्राण्याने कळपातील वासरावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले.त्या वन्य प्राण्यांनी पुन्हा हल्ले सुरू केल्याने बार्शी तालुक्यात भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे.
वाघ तालुक्यात व लगतच्या जिल्ह्यात येऊन तब्बल आठ महिन्यांचा कालावधी उलटूनही वन विभागास अथवा त्या वाघाला पकडण्यासाठी आलेल्या पथकाला वाघ पकडण्यात यश आलेले नाही. त्यामुळे संबंधितांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शेतकर्यांमध्ये मात्र वाघाची भीती कायम आहे.