बार्शी : सोलापूर व धाराशिव जिल्ह्यात गत काही महिन्यापासून धुमाकूळ घालत असलेल्या बिबटे व वाघाची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. धाराशिव जिल्ह्यातून सुरू झालेला वाघ व बिबट्याचा हा प्रवास बार्शी तालुक्यात चांगलाच स्थिरावला असून पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याच्या घटना घडत आहेत. वनविभागाचे अधिकारी केवळ कागदी घोडे नाचवण्यात दंग आहेत. आम्ही प्रस्ताव पाठवण्याचे काम केले असे सांगून वेळ मारून नेली जात आहे.
अलीकडील काळात वाघाने दररोज एक दोन पाळीव प्राण्यांचा बळी घेण्यास सुरुवात केली आहे. अपवादात्मक घटना वगळता त्याने अद्याप जरी मनुष्य प्राण्याचा बळी घेतला नाही. मात्र भविष्यात अशा घटना घडू शकतात. वाघ, बिबट्या आदी वन्यप्राणी त्यांच्या कार्यक्षेत्रात अधिवास करतील ,ते जंगलाबाहेर पडणार नाहीत यासाठी वरिष्ठ पातळीवरून काही उपाययोजना केल्या जाऊ शकतात. मात्र त्या उपाययोजना करण्याकडे वनविभागाचे मात्र दुर्लक्ष होत असल्याचा आरोप बार्शी तालुक्यातील शेतकर्यांतून होत आहे.
यापूर्वी येडशी - पांगरी नजिकच्या धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात असलेल्या रामलिंग अभयारण्यात ‘वाघा’चे आगमन परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचा विषय ठरला होता.वन विभागाच्या अधिकार्यांकडून व वन्य प्राणी अभ्यासाकाकडून यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर या अभयारण्यातून आलेल्या त्या पट्टेरी वाघाचे वास्तव्य बार्शी तालुक्यात लगच्या रामलिंग अभयारण्यात जास्त काळ राहणार नाही असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र त्यांचा तो अंदाज सद्यस्थितीत तरी फोल ठरत असल्याचे या तालुक्यातील वाघाच्या अस्तित्वावरून व होणार्या हल्ल्यांच्या घटनावरून सिद्ध होत आहे.
त्या वाघाने 500 किलोमीटरच्या प्रवासादरम्यान आपल्या पोटाची भूक कशी भागवली असेल ? पाळीव प्राण्यावर त्यांनी हल्ले केले नसतील का? असे एक ना अनेक प्रश्न या पट्टेरी वाघाच्या प्रवासादरम्यान निर्माण होताना दिसून येत आहेत. तो वाघ पांगरी जवळ एका शेतकर्याने त्याच्या गाईवार भर दिवसा जीवघेणा हल्ला करताना पाहिल्यानंतर सर्व प्रथम उजेडात आला. पांगरी, येडशी या भागात पूर्वीच्या काळी वाघाची संख्या चांगली होती अशा चर्चा जुन्या लोकांकडून ऐकण्यास मिळतात. मात्र जंगलांची ,जंगलातील झाडांची व त्यांच्या अधिवासांची जागा, लोकांकडून जंगलात वाढलेले अतिक्रमण, जंगलातील जमिनीचा शेतीसाठी होणारा वापर ,जंगलामधील मानवांचे वाढलेले अस्तित्व व अधिवास या बाबींचा परिणाम होऊन वन्य प्राणी हळूहळू जंगलाबाहेर पडण्यास सुरुवात होऊ लागली आहे.
आत्तापर्यंत बार्शी तालुक्यात उपळाई (ठोंगे), चारे, घोळवेवाडी, पांढरी, मुंगशी, राळेरास, लाडोळे आदी भागात वाघाने पाळीव प्राण्यांवर जीव घेणे हल्ले करून त्यांचा बळी घेतला आहे. त्यामुळे तालुक्यात बळीराजा व पशुपालक भीतीच्या छायेत आहेत.शेतकर्यांसाठी भीतीदायक ठरलेला वाघ आणि त्यांच्या बंदोबस्ताबाबत वनविभागाने तत्पर हालचाली करणे गरजेचे आहे.