सोलापूर : राज्य परिवहन महामंडळाचे विविध मार्गावर धावणार्या बसेसच्या तपासणी मोहिमेत जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत या विभागातील वेगवेगळ्या बसमधून विनातिकीट प्रवास करत असलेले 149 प्रवासी आढळून आले. या विनातिकीट प्रवाशाकडून प्रवास भाडे व दंडासह 31 हजार 656 रुपये रक्कम वसूल केला आहे. शिवाय, गेल्या वर्षभरात तिकिटाचे पैसे खिशात घातलेल्या 10 वाहकांसह जवळपास 200 प्रवासी तपासणी पथकाच्या तपासणीत आढळून आलेले आहेत.
महामंडळाच्या बसमधील गर्दीचा फायदा घेत काही फुकटे प्रवासी बिनधास्तपणे तिकीट न काढताच प्रवास करतात. महामंडळाच्या मार्ग तपासणी मोहीम नेहमी सुरू असते. या विभागात विभागीय व्यवस्थापक कार्यालयाच्या प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांच्या सूचनेनुसार तपासणीची नेहमी सुरू असते. वाहतूक निरीक्षकांचे पथक नियमितपणे जिल्ह्यातील मंगळवेढा, अक्कलकोट, मोहोळ, सांगोला, बार्शी, पंढरपूर, माढा, करमाळा, उत्तर व दक्षिण सोलापूर व माळशिरस असे विविध 11 तालुक्यांतील मार्गावर तपासणी करते. यात आढळलेले फुकट प्रवाशांकडून प्रवास भाडे व दंड वसूल केल्याने महामंडळाच्या तिजोरीत भर पडली आहे.
प्रवाशांनी बसमध्ये तिकीट काढूनच प्रवास करावा, ऑनलाईन पेमेंटची देखील सोय आहे. लांब व मध्यम लांब प्रवासांनी आगाऊ तिकीट आरक्षित केल्यास त्यांना तिकीट दरात 15 टक्के सवलतही मिळू शकते.- अमोल गोंजारी, विभागीय व्यवस्थापक राज्य परिवहन महामंडळ