बार्शी : पुणे येथून आलेल्या तीन तरुणांनी मेसेजच्या कारणावरून कुसळंब (ता.बार्शी) येथील एकाच्या घरी जाऊन दोनदा गोळीबार केला. तसेच,एकाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. दैव बलवत्तर म्हणून या हल्ल्यात तरुणाचा जीव वाचला.
हल्लेखोरांनी गावातील लोकांनाही पिस्तूलने धमकावले. गुरुवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. दरम्यान, हल्लेखोर तरुण लोखंडी रॉड व पिस्तूलच्या रिकाम्या पुंगळ्या घेऊन जाण्यासाठी पंधरा मिनिटांनी परत आले आणि जाताना जखमीला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. घटनेनंतर हल्लेखोर पुण्याच्या दिशेने पळून गेले. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाळासाहेब नंदकुमार उकिरडे (वय 24, रा. कुसळंब) असे बेदम मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर योगेश भास्कर मोरे (वय 28, रा. पुणे) व अन्य अनोळखी दोघे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळतात उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर, स.पो. नि. दिलीप ढेरे यांच्यासह तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
याबाबत माहिती अशी, बाळासाहेब उकिरडे हा तरुण बार्शी येथील बाह्यवळण रस्त्यावरील अकॅडमीमध्ये पोलिस भरतीसाठी सराव करत होता. एक वर्षापासून तो कडब्याचा व्यापार करतो. त्याचा भाऊ श्रावण याने योगेश याला तू बाळूच्या मागे का लागला आहेस असे विचारले. त्यावेळी योगेश सोबत आलेल्या दुसऱ्या हल्लेखोराने श्रावणच्याछातीला पिस्तूल लावून दहशत निर्माण केली. बाळासाहेब याचे चुलते बालाजी उकिरडे यांनी श्रावणाला गाडीतून खाली उतरवून घेतले.
योगेश मोरे हा पंधरा वर्षांपूर्वी कुसळंब येथून पुणे येथे कामाच्या निमित्तान गेला आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस उप निरीक्षक बालाजी वळसने, राजेंद्र मंगरूळे ,राहुल बोंदर याचे एक व स्थानिक गुन्हे शाखेचे धनाजी केकान ,सिद्धेश्वर लोंढे यांचे दुसरे पथक रवाना करण्यात आले आहे.