सोलापूर : शहरात 24 तासात तिघांनी गळफास घेऊन जीवन संपवले आहे. यामध्ये एक विवाहिता आणि दोन तरुणांचा समावेश आहे. दरम्यान, वाढत्या आत्महत्यांच्या घटनांनी चिंता व्यक्त होत आहे.
भवानी पेठेतील मुकुंद नगर येथे राहणार्या विशाखा सोनबा सदाफुले (वय 24) या विवाहितेने अज्ञात कारणावरून बुधवारी (दि.17) सकाळी साडेअकराच्या सुमारास राहत्या घरी फेट्याच्या सहाय्याने गळफास घेतला. पती सोनबा सदाफुले याने तिला खाली उतरून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले.परंतु, उपचारापूर्वी ती मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दुसर्या घटनेत परमेश्वर ऊर्फ आकाश भारत ससाणे (वय 29, रा. राजीव गांधी नगर, भवानी पेठ, सोलापूर) याने अज्ञात कारणावरून बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता मावशी मंदाकिनी घोळसंगे हिच्या घरी पत्र्याच्या वाशाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. भाऊ विकास ससाणे याने जोडभावी पेठ पोलिसांच्या मदतीने त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वी तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
तिसर्या घटनेत निलेश विकास भडकवाड (वय 25, रा. जयमल्हार चौक, बुधवार पेठ, सोलापूर) याने मंगळवारी (दि.16) सायंकाळी राहत्या घरी लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. नातेवाइकांनी फौजदार चावडी पोलिसांच्या मदतीने त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वी तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या तीनही घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे.