सोलापूर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलीस आयुक्तांनी शहरातील गुन्हेगारांवर मोठी कारवाई केली. तीन सराईत गुन्हेंगारांना एमपीडीएअंतर्गत दोन वर्षांसाठी स्थानबद्ध केले. यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.
मिथुन धनसिंग राठोड (वय 33, रा. घोडातांडा, ता. द. सोलापूर), सलमान गुडुभाई पटेल (वय 27, रा. मजरेवाडी, सोलापूर) आणि अश्रफअली ऊर्फ टिपू मन्नान ऊर्फ मुनाफ बागवान (वय 33, रा. शुक्रवार पेठ, सोलापूर) अशी कारवाई झालेल्या तिघा सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.
महानगरपालिका निवडणूक प्रक्रिया निर्भीड वातावरणात सुरळीत व पारदर्शकपणे पार पाडण्याच्या दृष्टीने पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी दोन दिवसांत या तिन्ही सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली.
मिथुन राठोड याच्यावर जेलरोड पोलीस ठाण्यात हातभट्टी दारूसंदर्भातील गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर या अगोदर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. सलमान गुडुभाई पटेल याच्यावर जेलरोड व एमआयडीसी पोलीस ठाण्यात तसेच अश्रफअली ऊर्फ टिपू मन्नान ऊर्फ मुनाफ बागवान याच्यावर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात जीवघेण्या घातक शस्त्रानिशीजबर दुखापत करणे, खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी मागणे, जबरी चोरी, विनयभंग करणे, तडीपार आदेशाचा भंग करणे, गृह अतिक्रमण करणे, दगडफेक करणे यासारखे गुन्हे दाखल आहेत. या दोघांवर यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. तिन्ही सराईत गुन्हेगारांची पुणे येथील येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त डॉ. आश्विनी पाटील, विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, प्रताम पोमण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, शिवाजी राऊत, प्रमोद वाघमारे, महादेव राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम घाडमे, विनायक संगमवार, सुदीप शिंदे, अक्षय जाधव, विशाल नवले आदींनी पार पाडली.