टेंभुर्णी : सोलापूरकडे निघालेल्या केमिकल टँकरने दुचाकीस मागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील ऊसतोड कामगार, त्याची पत्नी व मुलीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोलापूर-पुणे महामार्गावर रविवारी पहाटे 3.30 च्या टेंभूर्णीजवळ वेणेगावमध्ये घडली. तिन्ही मयत हे कोटबंधनी रायपूर (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील रहिवासी आहेत. अपघातानंतर टँकर चालक पळून गेला.
मीरा राज्य भील (वय 38), खारकी मीरा भिल (26) व पायल मीरा भील (15) अशी मयतांची नावे आहेत. 4 जानेवारी रोजी पहाटे 3.30 च्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावर पती, पत्नी व मुलगी असे तिघे दुचाकीवरून सोलापूरच्या दिशेने जात होते. वेणेगाव येथील बोगद्यातून वळून महामार्गावर येत असताना पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने जात असलेल्या भरधाव केमिकल टँकरने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात दुचाकीवरील तिघे जागीच मयत झाले. हे ऊसतोड कर्मचारी पंढरपूर तालुक्यात ऊसतोडणीचे काम करीत होते. ते भल्या पहाटे नेमके कुठे निघाले होते हे अद्याप स्पष्ट झाले नाही. या अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्तीपथक व टेंभुर्णी पोलिस स्टेशन येथील कर्मचारी, मोडनिंब महामार्ग पोलिस मदत केंद्राचे पोसई किरण अवताडे, त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मोडनिंब महामार्ग पोलिस मदत केंद्राचे विजय साळुंखे व कर्मचाऱ्यांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली.