सोलापूर : सोलापुरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहरातील विविध ठिकाणाहून तीन दुचाकी तर एक रिक्षा चोरीला गेली आहे. दुचाकी चोरीच्या रोज घटना घडू लागल्याने चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे.
पहिल्या घटनेत सिद्धेश्वर मार्केट यार्ड येथील एन. बी. कांद्याच्या दुकानासमोरून दुचाकी (क्रमांक एम एच 13 डी एल 4794) ही चोरून नेल्याची घटना 19 मार्चला घडली. याबाबत सुभेदार गुलाब शेख (वय 38, रा. संगमेश्वर नगर, अक्कलकोट रोड) यांनी फिर्याद दिली. दुसर्या घटनेत मार्केट यार्ड येथील चिलकंडे कांद्याच्या दुकानासमोरून दुचाकी (क्रमांक एम एच 13 ई बी 6295) ही दुचाकी 20 मार्चला चोरून नेली. याबाबत पारस अनिल गायकवाड (वय 29, रा. गुजर वस्ती, बुद्ध विहार जवळ) यांनी फिर्याद दिली.
तिसर्या घटनेत चडचणकर पेट्रोल पंपासमोर पार्क केलेली रिक्षा (क्रमांक एम एच 13 बी व्ही 2061) ही चोरून नेल्याची घटना 20 मार्चला घडली. रिक्षा पार्क करून मुलीस सेंट्रल हॉस्पिटल येथे पाहण्यासाठी गेले असता अज्ञात चोरट्याने रिक्षा चोरून नेली. याबाबत नासिर अ. अजीज खान (वय 50, रा. मोदीखाना पाच कंदील) यांनी तक्रार दिली. चौथ्या घटनेत मार्केट यार्ड येथील प्रधान हॉटेल समोरून दुचाकी (क्रमांक एम एच 13 सी जी 9507) ही चोरून नेल्याची घटना 20 मार्चला घडली. याबाबत बाळू सोपान साबळे (वय 41, रा. राजीव नगर झोपडपट्टी, भवानी पेठ) यांनी पोलिसात तक्रार दिली. चारही घटनांची नोंद जेलरोड पोलीस ठाण्यात झाली आहे.
दरम्यान मागील दोन दिवसांत शहरातून सहा दुचाकींची चोरी झाल्याचे गुन्हे दाखल आहेत. वाहन चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. पोलिसांनी ठोस कारवाई करण्याची मागणी आता नागरिकांकडून करण्यात येत आहे.