सोलापूर

Solapur Accident: वाढदिवस साजरा करून येताना तिघा मित्रांवर काळाचा घाला

थांबलेल्या ट्रकवर कार आदळली; अन्य दोघे जखमी

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : पुणे महामार्गावरील धाब्यावर मित्राचा वाढदिवस साजरा करून घरी परतणाऱ्या तिघा मित्रांवर काळाने घाला घातला, तर दोघे बालंबाल बचावले. बुधवारी (दि. 6) मध्यरात्री शेळगी पुलावर झालेल्या भीषण अपघातात तीन मित्रांचा जागीच मृत्यू झाला.

शेखर सुरेकर (वय 30, रा. कुमठा नाका, सोलापूर), कारचालक अमोल धैर्यशील येरटे (वय 40, रा. दाळगे प्लॉट, भवानी पेठ, सोलापूर) व कादर सैदू हांडे (वय 33, रा. कुमठा नाका, सोलापूर) अशी त्यांची नावे आहे. स्वरूप कोथिंबिरे (रा. जुनी मिल चाळ, सोलापूर) आणि अमित जाधव (वय 30, रा. शास्त्री नगर, सोलापूर) हे दोघे जखमी आहेत. अपघाताची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.

माहिती अशी, कादर हांडे याचा सात मे रोजी वाढदिवस होता. बुधवारी रात्री वाढदिवस साजरा करण्यासाठी कादर त्याच्या चार मित्रांसोबत पुणे रोडवरील धाब्यावर गेला. रात्री बारा वाजता वाढदिवस साजरा करून सर्वजण मध्यरात्री एकच्या सुमारास कारने (एम.एच. 13 ई.के. 7209) घराकडे परत येत होते. तुळजापूर नाका चौकाजवळील पर्ल गार्डन समोर त्यांच्या कारने थांबलेल्या ट्रकला (एम.एच. 13 सी.यु. 8699) पाठीमागून जोरदार धडक दिली. यात कारच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला. कारचे छत बाजूला पडले. धडक दिल्यानंतर कार शंभर फूट फरफटत गेली. शेखर, अमोल आणि ज्याचा वाढदिवस होता तो कादर या तिघांचा मृत्यू झाला.

जोडभावी पेठ पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. गुरुवारी सकाळी पाचही मित्रांचे नातेवाईक तसेच मित्र परिवाराने शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती. कुटुंबीयांच्या आक्रोशाने उपस्थितांचे मन हेलावत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT