सोलापूर : जिल्ह्यात दोन हजार 607 वैयक्तिक शौचालयांचे काम पूर्ण झाले आहे. त्यातील काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा झाला आहे. उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यावर निधी जमा करण्यासाठी आणखी तीन कोटी रुपयांची गरज आहे. मात्र, शासनाकडे निधी उपलब्ध नसल्याने वैयक्तिक शौचालयांची कामे पूर्ण करूनही निधीची वाट पहावी लागत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे.
जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने स्वच्छ भारत मिशन टप्पा दोन अंतर्गत जिल्ह्यात तीन हजार 98 वैयक्तिक शौचालयाचे उद्दिष्ट्य ठेवले आहे. त्यातील दोन हजार 607 शौचालये बांधून पूर्ण झाली आहेत. त्यातील एक हजार 27 लाभार्थ्यांच्या खात्यावर एक कोटी 23 लाखांचा निधी जमा केला आहे. उर्वरित लाभार्थ्यांसाठी आणखी तीन कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. मात्र, शासनाकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे निधी उपलब्ध नसल्याने वेळेवर निधी देण्यास अडचण निर्माण होत आहे.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक शौचालये बांधणार्या लाभार्थ्यांना बारा हजारांचे अनुदान त्यांच्या खात्यावर जमा केले जाते. आत्तापर्यंत एक कोटी 23 रुपयांचे अनुदान जमा केले आहे. उर्वरित लाभार्थ्यांसाठी आणखी तीन कोटी रुपयांची गरज आहे.- अमोल जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी व स्वच्छता