कुर्डूवाडी : उजनी (ता. माढा) येथे बिबट्याने दोन दिवसांत ठिकठिकाणी केलेल्या हल्ल्यात तीन वासरे मृत्यूमुखी पडली. बिबट्याचा बंदोबस्त करा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
येथील पद्मकुमार तात्यासाहेब इंगळे (पालवण रोड) यांच्या जर्शी गायीचे वासरू, पप्पू तानाजी लोकरे (पिंपळनेर रोड) यांची जर्शी गाय कालवडीवर तर सोमवारी 28 जुलैला रोजी गोटू संतोष जाधव यांच्या आकुंभे रोड जाधव वस्तीवरील जर्शी गायीचे वासरावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडले.
सध्या बिबट्याचा पिंपळनेर, आरण, उजनी मा परिसरात चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी व मजूर वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभाग गेल्या दोन महिन्यांपासून मयत झालेल्या जनावरांचे पंचनामे करत असुन आणखी एकाही शेतकर्याला त्याचा मोबदला मिळाला नाही. त्यामुळे वनविभागच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्या या परिसरात असून वन विभागाने त्याचा बंदोबस्त करावा व या अगोदर बिबट्या हल्यात मयत जनावरांच्या पशु पालकांना त्वरित मोबदला मिळावा, अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामपंचायत सदस्य संदीप पाटील यांनी दिला आहे.