Pandharpur Goat Theft Case
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे व लक्ष्मी टाकळी येथून चोरट्यांनी शेतकऱ्यांनी घरासमोर बांधलेल्या शेळ्या चोरुन नेल्या होत्या. याबाबत पंढरपूर तालुका पोलिसांनी केलेल्या तपासात उमेदी येथे शेळ्या मिळून आल्या आहेत. या प्रकारणातील दोन महिला चोर व एक पुरुष चोरट्यास ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याचे कबूल केले आहे. पोलिसांनी सहा पैकी चार शेळ्या आणि शेळ्या चोरीसाठी वापरण्यात आलेला टेम्पो असा एकूण 6 लाख 15 हजाराचा मुदेमाल जप्त केला आहे.
लक्ष्मी टाकळी येथे दि. 2 जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास तर दि.12 जानेवारी रोजी गुरसाळे गावातून समाधान बाबर यांच्या शेळ्या चोरून नेल्या होत्या. त्याबाबत समाधान बाबर यांनी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे तक्रार दिल्यावरून अज्ञातचोराविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी फिर्यादी यांना सोबत घेऊन उमदी येथील गावात जाऊन सखोल तपास केला. तेव्हा तेथे चोरीतील शेळ्या महिला चोराकडून जप्त केल्या.
याप्रकरणी माधुरी भानुदास चव्हाण (वय 38, रा. माळीनगर), अंबिका सोमनाथ काळे (वय 38, रा. सवतगाव), उदय विजय काळे (वय 21, रा. सवतगाव, ता. माळशिरस) यांना ताब्यामध्ये घेतले. त्यांच्याकडून चोरीच्या गुन्ह्यातील 6 शेळ्या, एक मोबाईल, एक टेम्पो असा एकूण 6 लाख 15 हजार रुपयाचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त केलेला आहे. सदर आरोपीकडून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात आलेली आहेत.
ही कामगिरी उपविभागी पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर, शहाजी गोसावी, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, विक्रम वाढणे, दत्तात्रय तोंडले, एएसआय रमेश बनसोडे, आबासाहेब शेंडगे, सुधाकर हेंबाडे, संजय गुटाळ, सागर गवळी, महिला पोलीस चोपडे, चालक पोलीस हसन नदाफ, विलास घाडगे यांनी केली आहे.