सोलापूर : राज्यातील जिल्हा परिषद, महापालिका, खासगी अनुदानित शाळेतील क्रीडा शिक्षक निवृत्त झाले आहेत. तर काही नवीन शाळा सुरू झाल्या आहेत. त्या शाळेतील क्रीडा शिक्षकांची हजारो पदे रिक्त आहेत. ती पदे वेळेवर भरण्यात येत नसल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य, फिटनेसवर परिणाम होत आहे. त्यामुळे रिक्त पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी पालकांतून होत आहे.
राज्यात दरवर्षी जिल्हा परिषद, महापालिका, खासगी अनुदानित शाळेतील जवळपास चार हजार क्रीडा शिक्षक सेवानिवृत्त होतात. ती पदे वेळेवर भरली जाणे अपेक्षित आहे. मात्र, संस्था, शासनाकडून क्रीडा शिक्षकांची रिक्त पदे वेळेवर भरली जात नसल्याने क्रीडा शिक्षकांची हजारो पदे रिक्त राहिल्याचा दावा क्रीडा शिक्षकांतून होत आहे. शासनाकडून गेल्या दोन वर्षात शिक्षकांची वीस हजार पदे भरण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील बर्याच शाळांना शिक्षक मिळाले आहे. विविध विषयांची शिक्षकांची रिक्त पदे ज्याप्रमाणे भरण्यात आली आहेत. तसेच क्रीडा शिक्षकांची रिक्त पदे भरावीत, अशी मागणी क्रीडा शिक्षकांतून होत आहे.
खेळाडू तयार होण्याचे प्रमाण घटतेय
शाळेतील क्रीडा संस्कृती कमकुवत होणे वार्षिक क्रीडा स्पर्धा, पीरियड, व्यायामशाळा उपक्रम नियमित होत नाहीत. विद्यार्थ्यांचा खेळांप्रति उत्साह कमी होतो. विद्यार्थ्यांना योग्य तांत्रिक मार्गदर्शन न मिळाल्याने खेळात सुधारणा होत नाही. त्यामुळे राज्य व राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांसाठी खेळाडू तयार होण्याचे प्रमाण घटते.
गुण विकसित होण्याची संधी कमी होतेय
खेळातून मानसिक आणि सामाजिक विकासावर परिणाम होत असते. एखादा खेळ खेळताना टीमवर्क, शिस्त, नेतृत्वगुण, स्पर्धात्मक वृत्ती यासारखे अनेक गुण विकसित होत असतात. तसेच खेळाच्या माध्यमातून मिळणार्या आनंदामुळे ताणतणाव कमी होत असते. मात्र, शाळेत क्रीडा शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याचे दिसत आहे.
राज्यात क्रीडा शिक्षकांची हजारो जागा रिक्त आहेत. जागा रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या शारीरिक, बौद्धिक, मानसिकतेवर मोठा परिणात होत आहे. लहान वयात खेळांचे योग्य मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केल्यास अनेक खेळाडू तयार होतात. त्यामुळे रिक्त जागा भराव्यात, अशी मागणी केली होती. त्यानुसार शासनाने 2025-26 शिक्षक भरतीमध्ये क्रीडा शिक्षकांची रिक्त पदे पोर्टलवरून भरण्यासाठी ऑप्शन दिले आहे. त्यामुळे क्रीडा शिक्षकांचे हजारो पदे भरली जाणार आहे.- दशरथ क्षीरसागर, जिल्हाध्यक्ष शहर-जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ