पंढरपूर : अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसान झाले. शासनाकडून सुमारे 60 कोटी रूपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण आहे. त्यांची नुकसानभरपाई खात्यावर जमा झाली आहे. परंतु 25 हजार शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण न झाल्याने नुकसान भरपाई लटकली आहे. पंढरपूर तालुक्यातीलही हजारो शेतकरी आधार अपडेट होत नसल्याने तसेच ई-केवायसी न केल्यामुळे ऐन दिवाळीत नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित राहणार आहेत. असे होऊ नये म्हणून प्रशासनाने योग्य मार्ग काढून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे. त्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरही नुकसान भरपाई जमा झाली आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली नाही, तांत्रिक अडथळा निर्माण झाला आहे, त्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई लटकली आहे. सप्टेंबर महिन्यात सोलापूर जिल्ह्यासह पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यांच्यासाठी शासनाने जवळपास 60 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी ज्या शेतकऱ्यांची ई- केवायसी पूर्ण झालेली आहे, त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाई जमा करण्यात आली आहे. तर उर्वरित शेतकऱ्यांची ई- केवायसी पूर्ण झाल्यानंतरच नुकसान भरपाई मिळणार आहे.
दिवाळीसारखा वर्षातील सर्वात मोठा सण तोंडावर असताना सरकारची मदत दिवाळीपूर्वी येणार म्हणून शेतकरी आस लावून बसला होता. परंतु ऑनलाईन पंचनामे आणि केवायसीच्या घरात सर्व्हर डाऊन असल्यामुळे महापूर बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहत आहे. पंढरपूर तालुक्यातील 2600 शेतकऱ्यांना केवायसी न केल्यामुळे मदत मिळत नाही आणि केवायसी करायला गेलं तर सर्व्हर डाऊन आहे. त्यामुळे शेतकरी हातात कागदपत्रे घेऊन ऑनलाईन सेंटरचे उंबरे झिजवित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था भीक नको पण कुत्रा आवर.. अशीच झाली आहे.- सचिन पाटील, तालुकाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना