सोलापूर

सोलापूर : दुधात भेसळ करणार्‍यांवर थेट गुन्हे; अप्पर जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत

दिनेश चोरगे

सोलापूर; महेश पांढरे :  दुधातील भेसळ रोखण्याची मागणी दूध उत्पादक संस्था, ग्राहक संस्था आणि पशुखाद्य उत्पादक प्रतिनिधींनी दुग्ध विकास व पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे केली होती. त्याची तातडीने दखल घेऊन मंत्र्यांनी त्या त्या अप्पर जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याचे आदेश दिले आहेत. सातत्याने तपासणी करून दोषी आढळणार्‍यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सध्या राज्यात आणि जिल्ह्यात उत्पादित होणार्‍या दुधामध्ये भेसळ वाढत आहे. त्याचा मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. सर्वसामान्य लोकांना चांगल्या प्रतीचे दूध उपलब्ध होत नाही. भेसळ करणारी मंडळी दुधात भेसळ करून दुधाचे उत्पादन अधिक झाल्याचा फुगवटा निर्माण करत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना योग्य दर मिळत नाही. दुसरीकडे त्याचा मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होतो. भेसळयुक्त दुधामुळे लहान मुलांना विविध आजारांना सामोर जावे लागते. या भेसळ करणार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली होती. त्यानुसार कृषी व पशुसंवर्धन दुग्ध विकास विभागमंत्री आणि उपसचिव यांच्या आदेशाने जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरावर समिती नेमण्याच्या सूचना दिल्या आहेत. समितीने धडक मोहिमाद्वारे दुधामध्ये भेसळ होते की नाही, याची तपासणी करावी. ज्याठिकाणी भेसळ आढळून येईल, त्या आस्थापना आणि व्यक्तीवर थेट गुन्हे दाखल करावे. त्यामध्ये सहभागी असणार्‍यांना सहआरोपी करावे. दर महिन्याला याचा अहवाल शासनाला देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

अशी असेल दूध भेसळविरोधी समिती

जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी अध्यक्ष, जिल्हा पोलिस अधीक्षक, अन्न व औषध प्रशासन उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, वैधमापनशास्त्र विभागाचे उपनियंत्रक हे सदस्य असणार आहेत. जिल्हा दुग्ध विकास व्यवसाय अधिकारी हे या समितीचे सदस्य सचिव असणार आहेत.

SCROLL FOR NEXT