सोलापूर : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत समीकरण जुुळली नाहीत. त्यामुळे आम्ही मैदानात नव्हतो. जर असतो तर सर्वांचा सुपडा साफच झाला असता, असा दावा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी सोलापुरात पत्रकारांशी बोलताना केला.
जरांगे यांनी पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. सरकार स्थापनेनंतर अंतरवाली सराटीमध्ये सामूहिक उपोषण केले जाणार आहे. त्यासाठी तुळजाभवानी माता आणि पंढरपुरच्या विठ्ठलाचे आशीर्वाद घेण्यासाठी रविवारी (दि. 1) तुळजापूर मार्गे सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात त्यांचे आगमन झाले. मराठा समाजाच्या वतीने त्यांचे सोलापूर शहराच्या वतीने स्वागत केले. यावेळी राजन जाधव, प्रा. गणेश देशमुख, शिवाजी चापले, सचिन तिकटे, माऊली पवार, संदीप काशीद, अरविंद गवळी, दादा गांगर्डे, विष्णू जगताप उपस्थित होते.
जरांगे यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्यात सरकार स्थापन होऊ द्या. त्यानंतरच आपण आरक्षणप्रश्नी करण्यात येणार्या उपोषणाची तारीख जाहीर करू. सरकार स्थापन होण्यापूर्वीच आम्ही उपोषणाची तारीख जाहीर केली तर राज्यात सरकार स्थापन करण्याऐवजी राष्ट्रपती राजवट लागू करतील आणि आमची गोची करतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.