सोलापूर : विद्यापीठाने बाजारपेठेची गरज ओळखून त्यानुसार अभ्यासक्रम सुरू करावेत. नवीन शैक्षणिक धोरणाचाही यासाठी फायदा होतो. त्याचा फायदा घेत विद्यापीठाने सोलापूरच्या वस्रोद्योग नगरीची ओळख जगभर पोहोचविण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेऊन त्यावर काम करावे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 20 व्या दीक्षांत समारंभात राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना विविध पदव्या देऊन सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबईचे कुलपती पद्मभूषण प्रा. जे. बी. जोशी, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे उपस्थित होते.
यावेळी एकूण 15 हजार 291 विद्यार्थ्यांना पदवी दिली. 71 संशोधक विद्यार्थ्यांना पीएच.डी पदवी तर 57 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले. प्रारंभी दीक्षांत मिरवणूक निघाली. यामध्ये अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषद, विद्यापरिषद, अधिसभा सदस्य आणि पदवी घेणारे विद्यार्थी बाराबंदी पोशाख परिधान करून सहभागी झाले होते.
राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले, सोलापूर ही वस्त्रोद्योग नगरी आहे. आज वस्त्रोद्योगाला चांगले दिवस आहेत. त्याचा फायदा घेत विद्यापीठाने वस्त्रोद्योगाविषयी विविध अभ्यासक्रम, प्रकल्प तसेच उपक्रम सुरू करून वेगळे नाव निर्माण करावे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती वर्ष आपण साजरे करत आहोत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या कुशल प्रशासक होत्या. देशभर मंदिरांचा जीर्णोद्धार त्यांनी केला. वस्त्रोद्योगातही त्यांची कामगिरी प्रसिद्ध आहे. सूत्रसंचालन डॉ. दीपक ननवरे व डॉ. तेजस्विनी कांबळे यांनी केले. कुलसचिव योगिनी घारे यांनी आभार मानले.