पंढरपूर : मंदिर समितीच्या लाडू प्रसाद केंद्रात तयार करण्यात येत असलेले बुंदीचे प्रसाद लाडू. Pudhari Photo
सोलापूर

श्री विठ्ठलाच्या लाडू प्रसादाचा भाविकांना गोडवा

मंदिर समितीकडून स्वत: निर्मिती; अन्न व औषध प्रशासनाच्या सूचनांचा अवलंब

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा

श्री क्षेत्र पंढरपूर येथे दरवर्षी आषाढी, कार्तिकी, माघी व चैत्री अशा चार प्रमुख यात्रा भरतात, तर दररोज हजारो भाविक श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. पंढरपूर हे धार्मिक पर्यटन केंद्र बनले आहे. यामुळे येथे देशभरातून भाविक, पर्यटक येतात. येथे आलेले भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनानंतर विठ्ठलाचा प्रसाद म्हणून बुंदी लाडू घेऊन जातात. विठ्ठलाचा प्रसाद हा मंदिर समिती स्वत: बनवत आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करत प्रसादाचा लाडू तयार करण्यात येत असल्यामुळे त्याचा दर्जा उत्कृष्ट असून भाविकांच्या पसंतीस उतरलेला आहे. दरम्यान, तिरुपती बालाजी येथील मंदिरात तयार करण्यात येत असलेल्या बुंदीच्या प्रसादात वापरण्यात येणार्‍या तुपामध्ये भेसळ असल्याचे प्रकरण गाजत आहे. असे असताना पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणीच्या प्रसादाची बुंदी मात्र भेसळमुक्त असल्याचे मंदिर समितीने वेळोवेळी दाखवून दिले आहे.

पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना श्रींचा प्रसाद म्हणून अल्प दरात बुंदी लाडू प्रसाद उपलब्ध करून देण्यात येतो. आषाढी यात्रेला 15 लाख तर इतर वार्‍यांना पाच लाख बुंदी लाडू तयार करण्यात येतो, तर दररोज सुमारे लाखभर बुंदी लाडू तयार करण्याचे काम अविरत चालू आहे. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सर्व सदस्य, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बुंदी लाडू बनविण्याचे काम सुरु आहे. बुंदी लाडू प्रसाद तयार करण्यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीमार्फत आवश्यक कच्चा माल चांगल्या दर्जाची हरभराडाळ खरेदी करून त्याचे एमटीडीसी भक्त निवास येथील लाडू उत्पादन केंद्रांमध्ये पीठ तयार करण्यात येते. त्यामुळे भेसळीचा प्रश्न येत नाही. डबल रिफाईंड शेंगदाणातेल, बेदाणा, काजू, वेलदोडे, रंग, सुपर एस. साखर इत्यादी घटक पदार्थांचा बुंदी लाडूसाठी वापर करण्यात येत आहे. तयार केलेला बुंदी प्रसाद लाडू पॅकिंगसाठी पर्यावरणपूरक कागदी पिशवीचा वापर करण्यात येतो. या एका पिशवीत 70 ग्रॅम वजनाचा एक असे दोन लाडू म्हणजे 140 ग्रॅमचा प्रसाद लाडू पॅकेट 15 रुपयांना विक्री केला जातो. श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणारा प्रत्येक भाविक हा लाडू प्रसाद खरेदी करत असतो.

या भाविकांना पुरेशा प्रमाणात लाडू प्रसाद उपलब्ध व्हावा, असे नियोजन मंदिर समितीमार्फत केले आहे. बुंदी लाडू केंद्रात कामाची जबाबदारी अनुभवी विभागप्रमुख पृथ्वीराज राऊत हे पाहत आहेत. बुंदी लाडू प्रसाद तयार करण्याासाठी नेमलेले कर्मचारी, स्वयंसेवक यांना हॅन्डग्लोज, ड्रेसकोड देत योग्य ती काळजी घेतली जात आहे. तसेच वेळोवेळी अन्न व औषध प्रशासनाची मदत घेतली जात आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून बुंदी लाडू प्रसाद विक्रीसाठी मंदिर परिसरात पश्चिम द्वार व उत्तर द्वार येथे कायमस्वरूपी लाडू स्टॉल उभा केले आहेत. हे स्टॉल सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येतात. बुंदी लाडू विक्रीतून वर्षाकाठी मंदिर समितीला 15 कोटींचा आर्थिक फायदा होत असल्याचे सांगण्यात येते.

श्री विठ्ठल रुक्मिणीच्या बुंदी लाडू प्रसादासाठी चांगल्या दर्जाची कोरडी हरभरा डाळ, डबल रिफाइंड शेंगदाणा तेल, बेदाणा, काजू, वेलदोडे, रंग, सुपर एस. साखर या घटक पदार्थाचा वापर करण्यात येत आहे. तसेच प्रसाद पॅकिंगसाठी पर्यावरण पूरक कागदी पिशवीचा वापर करण्यात येत आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून बुंदी लाडू प्रसादाची निर्मिती करण्यात येत आहे.
- राजेंद्र शेळके, कार्यकारी अधिकारी मंदिर समिती पंढरपूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT