सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : चेन्नई सुरत ग्रीनफिल्ड महामार्गाबाबतीत पालकमंत्र्यांनी आश्वासन देऊन पंधरा दिवसांपेक्षा जास्त दिवस उलटले तरी बैठक लागली नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. दोन दिवसात बैठक न घेतल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय शेतकरी संघर्ष समितीने घेतल्याची माहिती अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. सोमवार दि.२७ मार्च रोजी सकाळी १० पासून सोलापूर अक्कलकोट मार्गावरील ब्यागेहळ्ळी फाट्यावर बाधित शेतकरी व विविध संघटना, राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ रास्ता रोको करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मागील काही दिवसांपूर्वी अक्कलकोटसह, दक्षिण सोलापूर आणि बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना कमी मोबदला मिळाल्याच्या निषेधार्थ प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन सुरू केले होते. यानंतर पालकमंत्र्यांनी तातडीची बैठक घेऊन या कामाला स्थगित देत असल्याचे सांगून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या दालनामध्ये बैठक लावणार असल्याचे जाहीर केले होते.
बैठक होऊन पंधरा दिवस झाले तरी अद्याप बैठकीचे निमंत्रण समितीला देण्यात आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडून रोज या विषयाबाबत विचारणा होत आहे. प्रशासनाचे कामकाजही सुरूच आहे. हायवेसंबंधी विविध कारवाया सुरूच आहेत. त्यामुळे आता संबंधितांनी याबाबतीत त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा इशारा समितीने दिला आहे. पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर नियोजित चक्काजाम आंदोलन देखील स्थगित करण्यात आले होते. आता ते पुन्हा करण्यात येईल अशी माहिती मोरे यांनी दिली.
यावेळी विश्वनाथ भरमशेट्टी, स्वामीनाथ हरवाळकर, दीपक पवार, मल्लिनाथ म्हेत्रे, कालिदास वळसंगे, भीमाशंकर बन्ने, सादिक बांगी, केदार माळी आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या भावना तीव्र
शेतकऱ्यांच्या भावना तीव्र झाले आहेत. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत या गंभीर प्रश्नाबाबत बैठक होणे अपेक्षित आहे. मात्र मंगळवार पर्यंत या बाबतीत कोणताच निरोप मिळालेला नाही. पालकमंत्री शब्द देऊन जर पाळत नसतील तर त्या शब्दाला काही अर्थ उरणार नाही. मग हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचे यावरून सिद्ध होते. शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचा डाव सरकारचा आहे, की काय अशी शंका निर्माण होते. शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. सरकारने लवकर निर्णय घ्यावा. अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही.
– बाळासाहेब मोरे (अध्यक्ष चेन्नई सुरत ग्रीनफील्ड हायवे संघर्ष समिती,अक्कलकोट)