सोलापूर

TET Paper Leak: ‘टीईटी पेपरफुटी’प्रकरणी सोलापूरच्या स्पर्धा परीक्षा ॲकॅडमी चालकाला अटक

महाराष्ट्र कनेक्शन अखेर उघड : भिवंडी पोलिसांची कारवाई; आतापर्यंत १६ जण अटकेत

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर / भिवंडी : राज्‍यासह देशभर गाजलेल्या टीईटी परीक्षा पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्राचे कनेक्शन अखेर समोर आले आहे. भिवंडी पोलिसांनी सोलापूर येथून प्रकाश धनसिंग पवार याला अटक केली असून, या प्रकरणातील ही १६वी अटक आहे. प्रकाश पवारला मंगळवारी (दि. ११) भिवंडी अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १५ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पवार हा सोलापूरजवळील कुमठे येथे ध्रुव प्रतिष्ठान संचलित रुक्‍माई पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र चालवतो. त्याच्या अटकेमुळे टीईटी पेपरफुटीचे धागेदोरे आता महाराष्ट्रातही खोलवर पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे.

टीईटी पेपरफुटी प्रकरणात सुरुवातीपासून उत्तर प्रदेश, बिहार आणि हरियाणा येथून आतापर्यंत १५ जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र, महाराष्ट्रात हा पेपर कोणाला विक्री केला जाणार होता, याबाबतचा तपास अद्याप सुरू होता. आता सोलापुरातून प्रकाश पवारला अटक झाल्याने या प्रकरणाला महाराष्ट्रातील कनेक्शन मिळाले आहे.

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बिजेंद्र गुप्ता पोलिसांच्या हाती लागल्यानंतर त्याच्या चौकशीत प्रकाश पवार याचे नाव समोर आले. पोलिसांच्या तपासानुसार, पवारने यापूर्वी अटक केलेल्या आरोपींना काही विद्यार्थ्यांची कागदपत्रे दिल्याचे निष्पन्न झाले आहे. ही कागदपत्रे नेमकी कोणत्या उद्देशाने देण्यात आली होती? पवारचा पेपरफुटीतील अन्य आरोपींशी नेमका काय संबंध आहे? तसेच महाराष्ट्रातील आणखी कोणकोणत्या व्यक्तींचा या प्रकरणात सहभाग आहे? याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे.

पवारच्या अटकेनंतर टीईटी पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता महाराष्ट्राच्या दिशेने वळला आहे. विद्यार्थ्यांची कागदपत्रे, त्यातील टीईटी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पेपर आणि मुख्य सूत्रधार बिजेंद्र गुप्ताच्या चौकशीत समोर आलेले पवारचे नाव यामुळे तपास यंत्रणांसमोर अनेक प्रश्न उभे आहेत. या साखळीत महाराष्ट्रातील आणखी कोण कोण सहभागी आहेत, याचा उलगडा तपासातून होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT