सोलापूर : फेब्रुवारीअखेर राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतीची मुदत संपणार आहे. त्यामुळे त्या ग्रामपंचायतींना पुढील निवडणूक होईपर्यंत मुदतवाढ द्यावी, अथवा विद्यमान सरपंचांनाच प्रशासक म्हणून नियुक्ती करावे, अशी मागणी सरपंच परिषदेने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली.
राज्यातील एप्रिल ते डिसेंबर 2020 कालावधीत निवडणुका झालेल्या ग्रामपंचायतींच्या मुदत फेब्रुवारीअखेर संपत आहेत. वास्तविक राज्य निवडणूक आयोगाकडून या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना, प्रभाग आरक्षण, मतदार याद्या व निवडणूक कार्यक्रम जाहीर होणे अपेक्षित आहे. मात्र, राज्यात सध्या महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत. त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका होणार आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुका लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल संपल्यावर प्रशासकांची नियुक्ती होणार आहे. त्यामुळे प्रशासक ऐवजी ग्रामपंचायतींना मुदतवाढ द्यावे, अशी मागणी सरपंचांकडून होत आहे.
दरम्यान, पालकमंत्र्यांना निवेदन देतेवेळी सरपंच परिषदेचे राज्य उपाध्यक्ष ॲड. विकास जाधव, जिल्हाध्यक्ष आदिनाथ देशमुख आणि महिला जिल्हाध्यक्ष कविता घोडके-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
पंचायतराज अभियानाला येईल गती
राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरू आहे. या अभियानाचा कालावधी 31 डिसेंबर 2025 पर्यंत होता. मात्र राज्यातील निवडणुका सुरू असल्याने या अभियानास 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ दिली. या मोहिमेस गती देण्यासाठी फेब्रुवारी 2026 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांना पुढील निवडणूक होईपर्यंत मुदतवाढ द्यावी. अथवा प्रशासक म्हणून सरपंच यांनाच नियुक्त केल्यास ग्रामपंचायतीचा विकास होणार आहे.