Chhatrapati Sambhaji Maharaj statue Pudhari
सोलापूर

Chhatrapati Sambhaji Maharaj statue: छ. संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यावरून मोहोळमध्ये तणाव

महामार्गाच्या आरक्षित जागेवर रात्रीतून पुतळा; पोलिसांचा बंदोबस्त

पुढारी वृत्तसेवा

पोखरापूर : मोहोळ शहरातील बसस्थानक परिसरात शनिवारी रात्री छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसविल्याने शहरात तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, त्या पुतळ्यास परवानगी आहे काय, याची खातरजमा करण्याचे काम सुरू असून नागरिकांनी शांततेसाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर व पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी केले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मोहोळ शहरातील बसस्थानक परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा अज्ञातांनी शनिवार, दि.21 रोजी रात्री बसविला. रविवारी सकाळी पुतळा बसविलेल्या ठिकाणी मोठी गर्दी झाली. त्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आल्याने तणावसदृश वातावरण निर्माण झाले.

दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर, पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांची मोहोळ शहरातील विविध पक्षांचे नेते, नागरिक, तहसीलदार सचिन मुळीक, व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली. त्यात चर्चा होऊन ही जागा

नेमकी कोणाच्या मालकीची आहे याच्या माहितीसाठी महामार्ग प्रशासनाला पत्र देण्यात आले. त्यात पुतळा बसविण्यासाठी परवानगी दिली आहे काय याचीही माहिती मागवली आहे. या बैठकीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपव्यवस्थापक मुकेश सिंग, साईड इंजिनियर सचिन पवार आदी उपस्थित होते.

दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ज्या ठिकाणी छ. संभाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात आला आहे त्या ठिकाणी राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या, शीघ्रकृती दलाची एक तुकडी तसेच सात पोलीस अधिकारी व 50 पोलीस कर्मचारी असा मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

परवानगीसंदर्भात विचारणा केली, पत्र दिले

यासंदर्भात तहसीलदार सचिन मुळीक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, बैठकीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना पत्र दिले असून पुतळा बसविण्यासाठी आपण लेखी परवानगी दिली आहे काय किंवा नसेल तर पुढील कार्यवाही काय, यासंदर्भात आम्हाला अहवाल सादर करावा, असे पत्र दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT