पंढरपूर : उजनी धरण शंभर टक्के भरले असल्याने उजनी धरणातून भीमा नदीत 40 हजार क्यूसेकचा विसर्ग करण्यात येत आहे. तर वीर धरणदेखील शंभर टक्के भरले असल्याने यातूनही 25 हजार क्यूसेक इतका विसर्ग नीरा नदीत सोडण्यात येत आहे.
हे दोन्ही विसर्ग (65000) संगम येथे एकत्रित येतात. त्यामुळे भीमा (चंद्रभागा) नदीला पूरसद़ृश्य परिस्थिती कायम आहे. हा विसर्ग पंढरपुरात दाखल झाला. त्यामुळे चंद्रभागा नदीपात्रात पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांना पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. तो अद्याप कायम आहे. उजनी धरण 100 टक्के भरले आहे. त्यामुळे उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदीपात्रात पूर नियंत्रणासाठी सोडण्यात आलेल्या विसर्गामध्ये वाढ करण्यात आली आहे. शुक्रवार, दि. 29 ऑगस्ट रोजी 40 हजार क्युसेक एवढा विसर्ग सोडण्यात आला आहे. धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. यामुळे या विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ होण्याची शक्यता आहे.
तसेच वीर धरण पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान वाढले आहे. वीर धरणातूनही नीरा नदीच्या पात्रात सुरू असलेल्या विसर्गात वाढ करुन तो 25 हजार क्युसेक इतका सुरू करण्यात आला आहे. पाण्याची आवक व पावसाचे प्रमाण लक्षात घेता नदीपात्रातील विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या भीमा नदीपात्रात पंढरपूर येथे 35 हजार 406 चा विसर्ग सुरू आहे. यात वाढ होण्याची शक्यता आहे.
बंधार्यावरूनही वाहू लागले पाणी
पंढरपूर येथील चंद्रभागा नदीवरील दगडी पूल तसेच गोपाळपूर येथील बंधारा पाण्याखाली आहे. तर पंढरपूर येथील बंधार्यावरूनही पाणी वाहू लागले आहे. विसर्ग वाढला तर नदीवरील कोल्हापूर पध्दतीचे 8 ही बंधारे पाण्याखाली जाण्याची भीती आहे.