Tembhurni police station
टेंभुर्णी : जबरी चोरीच्या गंभीर गुन्ह्याचा अवघ्या ४८ तासांत छडा लावत दोन आरोपींना अटक करण्यात टेंभुर्णी पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत सहा तोळ्यांची सोन्याची चेन आणि गुन्ह्यात वापरलेले टेम्पो वाहन जप्त करण्यात आले आहे.
११ एप्रिल रोजी रात्री वरवडे-व्होळे रोडवर ही घटना घडली होती. ऋषिकेश अर्जुन गाडे (रा. गुंफावाडी, ता. लातूर) हे आपल्या मित्रासह कारमधून जात असताना तीन अज्ञातांनी दुचाकी आडवी लावून त्यांची कार अडवली. “तू आमच्यावर का थुंकला?” असा जाब विचारत त्यांनी दोघांना कारमधून बाहेर ओढून बेदम मारहाण केली. यानंतर गाडे यांच्या गळ्यातील सुमारे सहा तोळ्यांची, अंदाजे साडेचार लाख रुपये किमतीची सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावून घेतली. तसेच त्यांच्या मित्राकडील दोन मोबाईलही लुटले. एकूण सुमारे ४ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज आरोपींनी पळवला होता. या प्रकरणी १२ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याची गंभीर दखल घेत तपासाची सूत्रे सहाय्यक पोलीस अधीक्षक राहुल आत्राम (आयपीएस) यांनी सपोनि गणेश चौधरी यांच्याकडे सोपवली. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला. तपासादरम्यान आरोपी पुणे जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर पोलिसांनी शिरूर तालुक्यातील विविध भागात शोधमोहीम राबवून पिंटू उर्फ लक्ष्मण भीमा गायकवाड (वय ३०) आणि योगेश अनिल भोसले (वय २१) यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्याकडून चोरीस गेलेली सोन्याची चेन हस्तगत करण्यात आली. तसेच गुन्ह्यात वापरलेले बडा दोस्त टेम्पो (क्र. एमएच-१३ डीक्यू-९७२३) जप्त करण्यात आले. एकूण सुमारे ९ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सपोनि गणेश चौधरी व त्यांच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. टेंभुर्णी पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.