टेंभुर्णी : अनेक नागरीकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अखेर अरण (ता. माढा) येथील भेंदू बाबाला अटक करून त्याच्यावर अंधश्रद्धा निर्मूलन कलमान्वये गुन्हा दाखल केला. त्याला 25 जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
राहुल शिंदे ऊर्फ अघोरीदादा (रा. अरण, ता. माढा) असे पोलिस कोठडी देण्यात आलेल्या भोदू बाबाचे नाव आहे. मौजे अरण शिवारातील अरण ते तुळशी जाणार्या रोडवर भापकर वस्ती जवळ राहुल शिंदे यांच्या घराच्या समोर त्याचा आश्रम असून तेथे महाकाली देवीचे मंदिर आहे.राहुल शिंदे हा मठात आलेल्या भक्तांना आजार बरा करणे, संतान प्राप्तीसाठी पूजा, विवाह तंत्र पूजा, नोकरी व व्यापारासाठी तंत्र हवन पूजा,महाकाली ऑनलाइन तंत्र, हवन अनुष्ठान पूजा, महिला आकर्षित करण्यासाठी वशीकरण व संमोहन पूजा अशा प्रकारची अघोरी कृत्य करून भक्तांना आकर्षित करत होता.
याबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या. त्याअनुषंगाने टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी सपोनि गिरीष जोग यांना कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार जोग यांनी अघोरी बाबांच्या आश्रमात धाड टाकली.तेथे अघोरी पूजेसाठी लागणारे साहित्य लिंबू, हळदी-कुंकू, काळे तीळ, काळे उडीद, काळ्या कापडाच्या बाहूल्या हे साहित्य जप्त केले.राहुल शिंदे यास न्यायालयात उभे केले असता त्यास 25 जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.