सोलापूर : उन्हाळ्याच्या सुट्टीत १५ मे ते १५ जून दरम्यान जनगणना केलेल्या शिक्षकांचे मानधन रखडले आहे. मानधन तत्काळ मिळावे, अशी मागणी शिक्षकांतून होत आहे.
जनगणना कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या जवळपास पाच हजार शिक्षकांचे मानधन प्रलंबित आहे. ते तात्काळ अदा करण्यात यावे, अशी मागणी शिक्षक भारती, संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
जनगणना हे देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे राष्ट्रीय कार्य असून शासनाच्या आदेशानुसार अनेक शिक्षकांनी उन्हाळी सुट्टीतही जनगणनेची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. मात्र, काम पूर्ण करूनही संबंधित शिक्षकांचे मानधन अद्याप प्रलंबित असल्याने शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळणार दहा हजार
जनगणना काळात शिक्षकांना १२०० रुपये प्रशिक्षणाचे आणि नऊ हजार रुपये मानधन असे एकूण दहा हजार २०० रुपये एका शिक्षकांना मिळणार आहे. मात्र, जुलै संपत आला, अद्यापही मानधन न मिळाल्याने शिक्षकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
जनगणनेची जबाबदारी शिक्षकांनी पूर्ण केली आहे. जनगणना कामासाठी नियुक्त सर्व शिक्षकांचे प्रलंबित मानधन तातडीने अदा करावे. अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.-सुजित काटमोरे, जिल्हाध्यक्ष, शिक्षक भारती संघटना