कामती : सोलापूर-मंगळवेढा राष्ट्रीय महामार्गावर रविवारी (दि. 19) दुपारी इंचगाव -बेगमपूरदरम्यान झालेल्या भीषण अपघातात एक तरुण शिक्षक जागीच ठार, तर दुसरा गंभीर जखमी झाला. पिकअपने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली.
महेश पांडुरंग पोपळे (वय 32) असे मृत तरुणाचे नाव असून, अतुल दिनकर डोके (वय 30, दोघे रा. अंकोली, ता. मोहोळ) असे जखमीचे नाव आहे. दीपक घाडगे (वय 29) असे पिकअप चालकाचे नावे आहे.
सोलापूरहून मंगळवेढ्याकडे जाणारा पिकअप (क्र. एम.एच. 09 एफएल 1126) रिकामी कॅरेट घेऊन भरधाव वेगाने जात होता. त्याचवेळी अंकोली येथील अतुल डोके आणि महेश पोपळे हे दोघे मित्र (एम.एच. 12 केएस 6883) या दुचाकीवरून बेगमपूरच्या दिशेने जात होते.
इंचगाव येथील हौसाबाई शॉपिंग सेंटरजवळ आले असता, भरधाव पिकअपने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. धडकेचा एवढा जोर होता की दोघेही रस्त्यावर फेकले गेले. यात महेश पोपळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते जागीच ठार झाले, तर अतुल डोके गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.