सोलापूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने येत्या मे आणि जून महिन्यात शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टीएआयटी) आयोजित करण्यात आली आहे. पवित्र पोर्टलवर सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत उमेदवारांची निवड टीएआयटी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे अर्ज करता येणार आहे. त्यामुळे शिक्षक होण्याची इच्छा असलेल्या पात्रताधारकांनी या परीक्षेची तयारी सुरू करावी, असे आवाहन परीक्षा परिषदेने केले आहे.
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागांच्या शाळांमध्ये मपवित्रफ या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीकरिता मशिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025फ या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहे.
सन 2017 नंतर 2022 साली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर आता मे आणि जून महिन्यात टीएआयटी परीक्षा घेण्याची घोषणा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने केली आहे. त्यामुळे लाखो भावी शिक्षक या परीक्षेला बसणार आहेत. ते आता परीक्षेच्या तयारीला लागले आहेत.
शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा
ऑनलाईन अर्ज सादर करावयाचा कालावधी
26 एप्रिल 2025 ते 10 मे 2025
ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक
10 मे 2025
प्रवेशपत्र ऑनलाईन प्राप्त करून घेण्याचा कालावधी
परीक्षेच्या सात दिवस आधीपासून
टीएआयटी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारेच शिक्षक पदासाठी भरती केली जाते. यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) पहिला आणि दुसरा पेपर उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांची अनुक्रमे इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीसाठी निवड केली जाते. तसेच इयत्ता नववी ते बारावीच्या शिक्षक पदांसाठी टीईटी उत्तीर्ण असणे आवश्यक नाही.
टेट म्हणजेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी परीक्षा या परीक्षांच्या माध्यमातून शासकीय प्राथमिक माध्यमिक व सर्व खासगी आस्थापनातील शाळेमध्ये शिक्षकांची नियुक्ती होती. यामध्ये प्रामुख्याने विना मुलाखती व मुलाखतसह शिक्षकांची निवड केली जाते.