सोलापूर : शहरातील एका नामांकित शाळेतील शिक्षकाने दहावीच्या वर्गात शिकणार्या एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. त्या शिक्षकाविरोधात सदर बझार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या सहा महिन्यात हा दुसरा प्रकार घडल्याने शाळेतील शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सोलापूर शहरातील एका मध्यवर्ती भागात असलेल्या शाळेत शिकवणार्या हणमंतु महादेव नलावडे (वय 56) या शिक्षकाने 19 एप्रिल रोजी एका विद्यार्थिनीला पार्किंगमध्ये अडवले, तिच्या खांद्यावर हात ठेवून स्वतःकडे ओढून घेतले. त्यानंतर शाळा सुरू झाल्यावर तीन जुलै रोजी पुन्हा वर्गावर आल्यावर तुला काही ज्ञान नाही, तू कामाची नाही, 10 वीला आहे, आता तू मला चांगली सापडली, तुला मी बघून घेतो असे म्हणत मुलीस धमकी दिली. ही गोष्ट मुलीच्या घरच्यांना समजल्यानंतर त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे तक्रार दाखल केली.
परंतु त्यानंतर कोणतीही कारवाई न झाल्याने कुटुंबीयांनी 30 जुलै रोजी सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. विद्यार्थिनीच्या आईच्या फिर्यादीवरून नलावडे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक संजीवनी व्हट्टे करीत आहेत.