सोलापूर : जिल्ह्यात माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत असणार्या सात हजार शिक्षकांच्या शिक्षक मान्यता, शालार्थ आयडी तपासून ऑनलाईन करण्यात येणार आहेत. त्यामुळे बोगस शालार्थ आयडी, मान्यतेला चाप बसणार आहे.
नागपूर विभागातील शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण शालेय शिक्षण विभागाने गांभीर्याने घेतले आहे. त्यामुळे शालार्थ आयडी, मान्यता ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी शालार्थ आयडीचे प्रकरण खूपच गांभीर्याने घेतले आहे. राज्यातील शिक्षण अधिकार्यांना त्यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांच्या मान्यता, शालार्थ आयडीची प्रकरणे ऑनलाईन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत असणार्या सात हजार शिक्षकांच्या शिक्षक मान्यता, शालार्थ आयडी तपासून ऑनलाईन करण्यात येणार आहेत.
पुण्याचे शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांनीही याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यामुळे लवकरच माध्यमिक शिक्षण विभागातर्फे मान्यता, शालार्थ आयडी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. माध्यमिक शिक्षण विभागात यापुढे यासंबंधी येणार्या सर्व फायली ऑनलाईन वर नोंद केल्या जाणार आहेत.
तत्कालीन शिक्षणाधिकार्यांच्या मान्यता प्रलंबित
माध्यमिक शिक्षण विभागात यापूर्वी नियुक्त झालेल्या प्रभारी व इतर शिक्षणाधिकार्यांनी दिलेल्या मान्यताबाबत शिक्षक संघटनांनी तक्रारी केल्या आहेत. त्या मान्यता प्रलंबित ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक शिक्षकांचा जीव टांगणीला लागला आहे.
शालार्थ आयडी, वैयक्तिक मान्यता घोटाळा उघडकीस आला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने बोगस मान्यता, शालार्थ आयडीला चाप बसावा, यासाठी माध्यमिक शिक्षण विभागातील सर्व शिक्षकांचे शालार्थ आयडी आणि मान्यता ऑनलाईन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे येत्या काही महिन्यात त्या तपासून ऑनलाईन केल्या जाणार आहेत.- सचिन जगताप, शिक्षणाधिकारी, माध्यमिक