सांगोला : कोणत्याही प्रकारच्या हवामानात चांगले वाढणारे, अत्यंत हलक्या जमिनीत, माळरानामध्ये, डोंगर उतारावर, शेताच्या बांधावरच नव्हे, तर कुठेही चांगले वाढणारे चिंचेचे झाड हे शेतकर्यांसाठी वरदान आहे. ‘चिंच’ हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे कोरडवाहू पीक आहे. सांगोला तालुक्यातील आठवडा बाजारामध्ये व्यापारी चिंचा घेतात व व्यापार्यांना चिंचा विकतात. त्याचप्रमाणे काही व्यापारी शेतकर्याचे चिंचेचे झाडच ठोक घेतात. सध्या चिंचेला बाजारात मोठी मागणी आहे. यामुळे शेतकर्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
चिंचेला उत्तम भाव मिळत असल्यामुळे हे कोरडवाहू क्षेत्रातील नगदी पीक म्हणून संबोधले जाते. भारतातील चिंच प्रामुख्याने कॅनडा, स्वित्झर्लंड, ग्रेट ब्रिटन, अमेरिका, फ्रान्स इत्यादी देशांमध्ये पाठविली जाते. चिंच विविध प्रकारांत निर्यात केली जाते. त्यामध्ये अख्खी चिंच, फोडलेली चिंच, गाभा, बियांची भुकटी यांचा प्रामुख्याने समावेश होतो. औषधी गुणांमुळे चिंचेला अरब लोक ‘भारतीय खजूर’ असे म्हणतात. तामिळनाडू, कर्नाटक, केरळ राज्यांत चिंचेचा व्यापार मोठ्या प्रमाणात चालतो. महाराष्ट्रातील चिंचेला चांगला 18 हजारांवर मिळत आहे. दक्षिण भारतात ती विक्री होते. यंदाच्या हंगामात चिंचेला 11,500 ते 18,000 प्रति क्विंटल दर मिळत आहे. चिंच या पिकाचे एकदा लावलेले रोप अनेक वर्षे म्हणजेच पिढ्यान् पिढ्या उत्पन्न देते. एका हंगामात, एका झाडाला 2 क्विंटल फळे मिळतात, जर झाड दहा वर्षे वयाचे असेल, तर 150 ते 200 किलो आणि 20 वर्षे वय असेल, तर 500 किलो उत्पन्न मिळत असल्याचे शेतकरी सांगतात.
सध्या चिंचेची मोठी मागणी आहे. बाजारपेठ मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येते. यावर प्रक्रिया करणारे कारखानेही आहेत. चिंचोक्यापासून कापडासाठी लागणारे रंग, औषधे तयार करण्यासाठी वापर केला जातो. चिंचोक्याला प्रति क्विंटल 3700 ते 4000 रुपये दर मिळत आहे.