सोलापूर : अहो, तलाठी साहेब, आमची नुकसान भरपाई अजून मिळाली नाही, कधी मिळणार? या प्रश्नाला उत्तरे देताना तलाठीही हैराण झाले आहेत. पूर आणि अतिवृष्टी अनुदानासाठी फार्मर आयडी नसल्याने ई-केवायसी करुन घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. ई- केवायसी करुन घेण्यासाठी शिबिरे घेऊनही अद्याप 24 हजार शेतकरी ई-केवायसीविना आहेत.
ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात निर्माण झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील 7 लाख 64 हजार 173 बाधित शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी 867 कोटी 37 लाख 63 हजार 855 रूपयांची मागणी अहवालाद्वारे केली होती. यातील सर्वच रक्कम मंजूर झाली आहे.
आतापर्यंत 5 लाख 99 हजार 661 शेतकऱ्यांसाठी 732 कोटी 04 लाख 45 हजार 440 रूपये मंजूर झाले असून, त्यापैकी 5 लाख 51 हजार 527 शेतकऱ्यांच्या खात्यावर आजतागायत 665 कोटी 2 लाख 99 हजार 571 रूपये झाले जमा झाले आहेत. ई-केवायसी, फार्मर आयडीअभावी 24 हजार 294 शेतकऱ्यांचे 26 कोटी 56 लाख 29 हजार 337 रूपये पेंडिंग पडले आहेत. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश मिळताच जिल्ह्यातील तलाठी भाऊसाहेबांनी पळापळी केल्याने 15 दिवसांत दीड लाख शेतकऱ्यांची ई-केवायसी होऊन त्यांच्या खात्यावर पैसेही जमा झाले.
अतिवृष्टी होऊन दीड महिना झाला तरी अजून 24 हजार 294 शेतकऱ्यांच्या खात्यावर दमडीही पडली नसल्याने त्यांना रब्बी हंगामाचे बी-बियाणे, खते घेण्यासाठी अडचण आली. शासनाच्या पोर्टलवर ही रक्कम अदा झालेली दिसत आहे. मात्र केवळ ई-केवायसी, फार्मर आयडीमुळे ही रक्कम लटकली आहे. जिल्हा प्रशासनाकडून ही रक्कम अदा करण्यासाठी धडपड चालू आहे. गावनिहाय कॅम्प सुरू केले आहेत. फार्मर आयडी, ई-केवायसी, ई-महासेवा केंद्र आणि प्रशासनाच्या शिबिरात जाऊन काढू लागले आहेत. मात्र अनेक अडाणी शेतकऱ्यांना या कामात यश येत नाही. यामुळे अशाच शेतकऱ्यांचे पैसे बँकेत पडले आहेत.
जिल्ह्यातील 103 महसूल मंडलात अतिवृष्टी झाली होती. राज्य सरकारने भरपाईसाठी तीन हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. या महापुरात अनेकांची शेती खरडून गेली आहे. अनेकांच्या ऊस व फळबागा वाहून गेल्या आहेत.
विहिरी बुजल्या आहेत, अशा शेतकऱ्यांना येत्या काही दिवसात पैसे मिळणार आहेत. महापूर आणि अतिवृष्टीने जिल्ह्यातील 12 हजार 50 हेक्टर क्षेत्रावरील माती खरडून गेली. त्यामुळे या जमिनी कसण्यायोग्य राहिल्या नाहीत. यासाठी राज्य शासनाकडे 57 कोटी रुपयांची मागणी केल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
गावोगावी शिबिरे घेऊन त्या शेतकऱ्यांची ई-केवायसी, ॲग्रीस्टॅक करून घेतले जात आहे. अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील विविध भागात झालेल्या शेती, पायाभूत सुविधा व सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी नुकताच केंद्रीय पथकाने सोलापूर जिल्ह्यात दौरा केला आहे. त्याचाही अहवाल केंद्राकडे जाणार आहे.
अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे काम सध्या सुरू आहे. फार्मर आयडी असलेल्या शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचत आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी नाहीत, अशा शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी गाव पातळीवर शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. यासाठी तलाठी यांना आदेश देण्यात आले आहेत.- कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी.