railway pudhari photo
सोलापूर

Train Robbery: तडवळ स्थानकात रेल्वेवर दरोडा

सिग्नलसाठी थांबलेल्या यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेसमध्ये घुसून दरोडेखोरांनी दागिने, रोकड लुटली, प्रवाशांना मारहाण

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील तडवळ रेल्वे स्थानकावर सिग्नलसाठी थांबलेल्या यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेस (गाडी क्र. १६५८७) मध्ये शनिवारी पहाटे दरोडेखोरांनी प्रवाशांना मारहाण करून दागिने, मोबाईल आणि रोकड लंपास केले. त्यांच्या दगडफेकीत काही प्रवासी जखमी झाले आहेत.

शनिवार, दि. १२ जुलै रोजी पहाटे २.४९ ते ४.०३ या दरम्यान तडवळ स्थानकावर सिग्नलसाठी रेल्वे तब्बल ७४ मिनिटे उभी होती. यावेळी चार ते सहाजणांच्या दरोडेखोरांच्या टोळीने एस-४, एस-६ आणि एस-७ या डब्यांना लक्ष्य केले. त्यांनी खिडक्यांतून हात घालून प्रवाशांचे सामान चोरले, तर काहींनी थेट डब्यात घुसून महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेले. एस-७ डब्यातील महेश गोपाळ पवार (रा. पूर्व मंगळवार पेठ, सोलापूर) यांच्या पत्नीचे सुमारे पाच तोळ्यांची सोन्याची चेनसह अन्य तीन प्रवाशांचे मोबाईल व रोकडही चोरून नेली.

महेश पवार यांच्या फिर्यादीवरून सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी दरोडेखोरांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक तांबोळी यांनी फॉरेन्सिक पथकासह घटनास्थळाची पाहणी केली. फरार दरोडेखोरांचा शोध सुरू आहे. ​या धक्कादायक घटनेमुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सोलापूरहून सिग्नल मिळाला नसल्याने गाडी होती उभी

यशवंत - बिकानेर एक्सप्रेस ही लांब पल्ल्याची एक्सप्रेस तडवळ सारख्या स्टेशनवर नेहमीच थांबते. सोलापूर विभागाकडून सिग्नल मिळाल्यानंतर ती पुढे सोलापूरच्या दिशेने धावते. २२ कोचची एक्स्प्रेस तासापेक्षा जास्त वेळ लहान स्टेशनवर थांबवण्याऐवजी मोठ्या स्टेशनवर थांबवली असती तर दरोड्याची घटना टळली असती. लहान स्टेशन, सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना नसल्याने २२ कोचच्या गाडीला रेल्वे सुरक्षा बलाचे दोन जवान कसे सुरक्षा देणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तडवळच्या स्टेशनवर लांब पल्ल्याची एक्सप्रेस एवढी दीर्घकाळ का थांबली याची चौकशी सुरू आहे. दरोडेखोर कसे आले याविषयीची माहिती घेण्याचेही काम सुरू आहे.
- जयदीप प्रदिक्षणे, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक, मध्य रेल्वे सोलापूर विभाग
रविवारी दिवसभर त़डवळ रेल्वे स्टेशन परिसर, कर्नाटकातील गावे आदी शक्यता पाहून सीसीटीव्हीची फुटेज तपासणी झाली. तपासकार्य सुरूच असून, अजून काहीही धागेदोरे मिळू शकले नाहीत.
-शब्बीर तांबोळी, पोलिस उपनिरीक्षक, लोहमार्ग पोलिस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT