सोलापूर

Akkalkot Bus Stand : स्‍वामी नगरीचे बसस्‍थानक पूर्णत्‍वाकडे

अक्‍कलकोट आगारप्रमुखांचे काटेकोर नियोजन

पुढारी वृत्तसेवा

हंजगी : श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि देशाच्या विविध भागांतून वर्षभर लाखो भाविक अक्कलकोटमध्ये दाखल होतात. त्यामुळे अक्कलकोट एसटी आगाराला केवळ प्रवासी वाहतुकीचे केंद्र म्हणून नव्हे, तर धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीनेही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

एकेकाळी जुन्या बसगाड्या, आर्थिक अडचणी, वाढता खर्च, नियोजनाचा अभाव आणि पायाभूत सुविधांची कमतरता अशा विविध समस्यांना सामोरे जाणाऱ्या अक्कलकोट एसटी आगाराची आता प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. आगारप्रमुखांचे काटेकोर नियोजन, कर्मचाऱ्यांचे योगदान, प्रवाशांच्या गरजांचा विचार आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे सहकार्य यामुळे आगाराच्या कामकाजाला नवी दिशा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.

काही काळापूर्वी अक्कलकोट एसटी आगाराची परिस्थिती अनेक कारणांमुळे आव्हानात्मक बनली होती. जुन्या बसगाड्या, देखभाल-दुरुस्तीचा वाढता खर्च, बससेवांचे नियोजन, प्रवाशांच्या वाढत्या अपेक्षा आणि आवश्यक पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे आगाराच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत होता. मात्र, अलीकडे परिस्थितीचा विचार करून वाहतूक व्यवस्थापन, बसफेऱ्यांचे नियोजन, उपलब्ध बसगाड्यांचा योग्य वापर आणि प्रवासी सेवांमध्ये सुधारणा करण्यावर भर दिला जात आहे.

आगाराचा कारभार अधिक शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध करण्यासाठी आगार प्रमुख सत्यजित खताळ परिश्रम घेताना दिसून येत आहेत. बसगाड्यांची उपलब्धता, वेळापत्रकाचे पालन, देखभाल-दुरुस्ती, स्वच्छता आणि कर्मचाऱ्यांच्या कामाचे योग्य नियोजन या बाबींना सत्यजित खताळ अधिक महत्त्व देताना दिसून येत आहेत.

अक्कलकोट शहराच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे सुमारे २९ कोटी रुपये खर्चाच्या नव्या बसस्थानकाचे सुरू असलेले पुनर्निर्माणाच्या कामाला अधिक वेग आला आहे. बसस्थानक परिसरातील अतिक्रमणे हटविण्याच्या कारवाईमुळे वाहतुकीसाठी आणि नियोजनबद्ध विकासासाठी जागा उपलब्ध होण्यास मदत झाली आहे. आधुनिक बसस्थानक पूर्ण झाल्यानंतर अक्कलकोटच्या धार्मिक पर्यटनाला आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक चालना मिळण्याची शक्यता आहे.

धार्मिक पर्यटनामुळे उत्पन्नवाढीची मोठी संधी

अक्कलकोट हे महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक तीर्थक्षेत्रांपैकी एक असल्यामुळे येथे वर्षभर भाविकांची वर्दळ असते. गुरुवार, पौर्णिमा, सण-उत्सव आणि सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांची संख्या वाढते. त्यामुळे एसटी महामंडळासाठी अक्कलकोट आगाराला उत्पन्नवाढीच्या दृष्टीने मोठी संधी उपलब्ध आहे. पुणे, मुंबई आणि राज्यातील इतर प्रमुख शहरांमधून अक्कलकोटला येणाऱ्या भाविकांसाठी बसफेऱ्या महत्त्वाच्या ठरत आहेत.

आ. कल्याणशेट्टी यांचे महत्त्वाचे योगदान

अक्कलकोटच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विकास करण्यासाठी लोकप्रतिनिधींचे सहकार्य आणि प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा महत्त्वाचा ठरतो. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या सहकार्यामुळे बसस्थानकाच्या विकासासह प्रवाशांच्या सुविधांशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य मिळत आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे सहकार्य, परिवहन महामंडळाचे धोरण आणि स्थानिक प्रशासनाचा समन्वय साधला गेल्याने अक्कलकोट आगाराच्या विकासाला अधिक गती मिळताना दिसून येत आहे.

उपलब्ध बसगाड्यांचा योग्य वापर, प्रवाशांच्या संख्येनुसार बसफेऱ्यांचे नियोजन, वेळेचे पालन, वाहनांची देखभाल, कर्मचाऱ्यांमधील समन्वय आणि अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी झाल्याने सध्या अक्कलकोट एसटी आगाराची वाटचाल प्रगतीकडे सुरू आहे.
-सत्यजित खताळ, आगार प्रमुख, अक्कलकोट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT