सोलापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने उसाची पहिली उचल 3400 रुपये मिळावी, यासाठी जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी श्री सिद्धेश्वर साखर कारखान्यांसमोर ठिय्या आंदोलन केले.
उसाला पहिली उचल तीन हजार 400 रुपये मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने मागील महिनाभरापासून साखर संचालक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील प्रत्येक साखर कारखान्यांना निवेदन देऊन आंदोलने करण्यात येत आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी हे सोलापुरात आले होते. त्यावेळी दोन दिवसात ऊसदर जाहीर न करणाऱ्या कारखान्यांची गव्हाणी बंद पाडू, असा इशारा दिला होता. त्यानंतरही कारखान्याने दर जाहीर न केल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने प्रत्येक कारखान्यांवर जाऊन ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे.
शनिवारी (दि. 6) गोकुळ शुगर तडवळ येथील गेटवर सहा तास ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर दि. 8 व 9 रोजी लोकमंगल साखर कारखाना भंडारकवठे, तर गुरुवारी (दि. 11) सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यावर तीन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी युवा जिल्हाध्यक्ष मोहसिन पटेल, इकबाल मुजावर, पप्पू पाटील, सुंटे, अब्दुल रजाक मकानदार, बसवराज हसापुरे, शहाजी यादगिरी, तुकाराम शेतसंदी, बसवराज रामपुरे यांच्यासह स्वाभिमानीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.