सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेतील भाजपच्या दणदणीत यशावर आता जोरदार राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या नूतन संपर्कप्रमुख सुषमा अंधारे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर थेट निशाणा साधला व भाजपच्या विजयात त्यांचे वैयक्तिक कर्तृत्व शून्य असल्याचा घणाघाती आरोप केला आहे. भाजपने आपली पारंपरिक कुटनीती, कपटनिती आणि साम-दाम-दंड या धोरणांचा अवलंब करूनच निवडणूक जिंकली असल्याचा दावा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत केला.
सोलापूर जिल्हाच्या संपर्कपदी नियुक्ती झाल्यानंतर सुषमा अंधारे सोलापूर दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी प्रसारमाध्यमाशी बोलाना त्यांनी पालकमंत्री जयकुमार गारे यांना लक्ष करत टीका केली. त्या म्हणाल्या की, भाजपचे धोरणच असे आहे की, सत्तेचा आणि पैशाचा वापर करून नगरसेवकांची संख्या वाढवायची. त्यामुळेच भाजपकडे जाणाऱ्यांचा ओघ वाढलेला दिसतो. कारण भाजप उत्तम प्रकारे निवडूक मॅनेज करू शकतो. त्यामुळे भाजपचा 87 जागी मिळालेला विजय हा जनतेच्या विश्वासावर नाही, तर पैशाच्या जोरावर मिळवलेला आहे. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आपली सोलापूरला ही पहिलीच भेट असल्याचे सांगत त्यांनी सुरुवातीला कोणतेही गंभीर आरोप करणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र बाई समजून हलक्यात घेऊ नका, माझ्याकडेही अनेक व्हिडिओ आणि पुरावे आहेत. वेळ आली तर ते सगळे बाहेर काढू शकते, असा सूचक इशारा देत त्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे नाव घेऊन अप्रत्यक्ष धमकीवजा टोला लगावला.
आमदारांना जाब विचारणार
नगरपालिकेत उबाठा आणि एकनाथ शिंदे यांच्यात झालेली युती पक्षाची नाही. पक्षप्रमुुख उध्दव ठाकरे यांच्याशी बोलणे झाले आहे. स्थानिक आमदार सोपल यांनी घेतलेला हा निर्णय आहे. त्या युतीशी पक्षाचे कसलेच देणे घेणे नसल्याचे अधिकृतपणे सुषमा अंधारे यांनी जाहीर केले. या संदर्भात आमदारांना पक्षप्रमुख जाब विचारणार असल्याचे सांगितले.