अक्कलकोट : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी एक लाख कोटीच्या निधीतून पुढील तीन वर्षांत रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात येणार असल्याची ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. सुरत चेन्नई महामार्गामुळे चित्र बदलणार असून सोलापूर जिल्हा देशाचे लॉजिस्टिक हब बनेल, असे त्यांनी सांगितले.
वागदरी - अक्कलकोट - तोलनूर व मोहोळ - बसवनगर- वळसंगचे पेव्हड शोल्डरसहित दुपदरीकरण करणे, दुधनी येथे रेल्वे उड्डाणपूल बांधणे, बोरी उमरगे येथे बोरी नदीवर मोठे पूल बांधणे आधी 2784 कोटी रुपयांची कामांचे भूमिपूजन मंत्री गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोलापूर जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की 2014 पर्यंत जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी 565 किमी होती, ती आता 1750 किमीपर्यंत वाढली आहे. त्यावेळी 52 हजार कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन झाले होते, त्यापैकी सोलापूर शहरातील उड्डाणपुलाचे काम वगळले तर सर्व कामे पूर्ण केल्याचे सांगून पुढील तीन वर्षाच्या काळात सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी एक लाख कोटीच्या निधीतून रस्ते विकासाची कामे मोठ्या प्रमाणावर घेऊन ते पूर्ण करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यामध्ये जुना पुना नाका ते बोरामणी नाका रस्त्यासाठी 1020 कोटी, अहमदनगर सोलापूर कर्नाटक बॉर्डर पर्यंतच्या रस्त्यासाठी दहा हजार कोटी, राष्ट्रीय महामार्ग 65 वरील कामासाठी 48 कोटी, मुळेगाव येथील रस्त्यासाठी 35 कोटी अशा पद्धतीने रस्ते विकासाची कामे हाती घेतली जाणार आहेत. सुरत चेन्नई हा महामार्ग सोलापूर जिल्ह्याचे चित्र बदलणारे ठरेल. असे सांगितले. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोट गाणगापूर, मोहोळ ते वळसंग सोलापूर शहरात साठी रिंग रोड मंजूर करण्याची मागणी केली.