सोलापूर : साखर कारखानदारांनी ऊस दर जाहीर करावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली. आंदोलकांनी ऊसपुरवठा करणाऱ्या वाहनांना जागेवर रोखले. यामुळे कारखाना बंद पडण्याचा धसका घेत साखर कारखानदारांनी पूर्वी जाहीर केलेल्या दरामध्ये आणखी दोनशे रुपयांची वाढ करत तीन हजार रुपये तर काही कारखान्यांनी त्यापेक्षा अधिक दर जाहीर केला. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी फुटली. दरम्यान, शनिवारी काही निवडक कारखान्यांनी वाढीव दर जाहीर केले. आणखीही बरेच कारखाने वाढीव दर जाहीर करतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊसदर जाहीर करण्यास उशीर केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसदर आंदोलन चिघळत चालले. पंढरपूर तालुक्यात शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. गेल्या पंधरा दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लोकमंगल, सिद्धेश्वर, ओंकार शुगर, पांडुरंग शुगर, सीताराम महाराज कारखाना येथे आंदोलन केल्याने ऊसदर आंदोलन चिघळत चालले. पंढरपुरात उपोषणास बसलेले समाधान फाटे यांची प्रकृती नाजूक बनत चालली होती. त्या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यांनी वाढीव ऊसदर जाहीर केला.
जिल्ह्यातील दि सासवड माळीनगर, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यशवंतनगर, विठ्ठल सहकारी, विठ्ठलराव शिंदे, पांडुरंग सह या साखर कारखान्यांने 30 नोव्हेंबरपर्यंत ऊस बीले संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले. ती रक्कम 2800 ते 2875 रुपये प्रमाणे होती. आता आंदोलनामुळे त्यात आणखी 200 रुपयांची वाढ केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर याआधीच शिवगिरी ॲग्रो 3001, ओंकार शुगर 3150, राजीव ॲग्रो आलेगांव माढा 3001 प्रमाणे दर जाहीर केले आहेत.