सोलापूर

Solapur farmers protest | खात्यात ऊसबिल जमा झाल्याशिवाय उठणार नाही : शेतकरी आक्रमक

तिसऱ्या दिवशीही आंदोलनावर ठाम, गोकूळ कारखान्यांकडे 130 कोटी रुपये थकीत

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्रे येथील गोकूळ साखर कारखान्याकडे धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अंदाजे 130 कोटी रुपये थकले आहेत. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यातील दोनशे शेतकरी गेल्या तीन दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत आहेत. जोपर्यंत खात्यात बिले जमा होणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे.

दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांच्या कार्यालयात शेतकरी नेते आणि गोकूळ साखर कारखान्याचे प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली. यावेळी येत्या काही दिवसात या कारखान्यावर आरआरसी कारवाई करुन शेतकऱ्यांच्या खात्यात ऊस बिल जमा करण्यात येईल, असे आश्वासन तहसीलदार जमदाडे यांनी दिले. मात्र, शेतकऱ्यांनी आम्हाला आताच ऊस बीले खात्यावर पाहिजेत, अशी मागणी केली. त्यामुळे या बैठकीत तोडगा निघाला नाही. त्यामुळे शेतकरी संघटनेचे नेते पुन्हा आंदोलनस्थळी येऊन बसले.

दरम्यान, गोकूळ साखर कारखान्याच्या प्रतिनिधींनी बिले जमा करण्यात येतील, आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती केली. मात्र, आंदोलक शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता तहसीलदार किरण जमदाडे यांनी आंदोलनस्थळी हजेरी लावून गोकूळ कारखान्यावर आरआरसी कारवाई करुन पुढील काही दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

पाणी, शौचालयांची व्यवस्था करा

जिल्हा परिषदेच्या गेटवर गेल्या तीन दिवसापासून दोनशेपेक्षा जास्त शेतकरी आंदोलन करत आहेत. यामध्ये काही महिलांचाही समावेश आहे. त्यामुळे येथे पाणी, शौचालय आणि औषधांची व्यवस्था करण्याची मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT