सोलापूर : संजय गांधी निराधार व श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेच्या लाभार्थ्यांना थेट डीबीटीमार्फत अनुदान दिले जात आहे. त्यामुळे आवश्यक कागदपत्रे जमा न केल्यास अनुदानापासून वंचित राहावे लागेल.
शासनाचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून राज्य व केंद्र पुरस्कृत योजनेत समाविष्ट असलेल्या लाभार्थ्यांकरिता यापूर्वी बीम्स प्रणालीवर प्राप्त होणार्या अर्थसहाय्याचे वितरण तहसील स्तरावरून बँकेत पाठवून संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग केले जात होते. आता शासनाने बदल करून संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन या योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या लाभार्थ्यांचे अनुदान राज्यशासनामार्फत डीबीटी प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केले जात आहे.
संबंधित लाभार्थ्यांची माहिती डी.बी.टी. पोर्टलवर भरून त्याचे आधार पडताळणीचे काम सुरू आहे. हयात प्रमाणपत्र, संबंधित लाभार्थ्यांची माहिती डीबीटी पोर्टलवर अपलोड नसल्याने अनेकांना अनुदानापासून वंचित राहावे लागले आहे. आता 31 जुलैपर्यंत कागदपत्रे न जोडल्यास अनुदानापासून वंचित राहण्याबरोबरच नावे वगळण्याची कारवाई होणार आहे.
राज्य निवृत्ती योजनेतील लाभार्थ्यांची नावे उपविभागीय अधिकारी क्र.1, उत्तर सोलापूर तहसीलदार, पालिका विभागीय कार्यालय क्र. 3 व8, परिमंडळ अधिकारी अ,ब,क, मंडळ अधिकारी कसबे, तलाठी कसबे येथे पाहता येईल.
योजनेसाठी बँक पासबुक, आधारकार्ड, शिधापत्रिका, अपंग प्रमाणपत्र, विधवा महिलेच्या बाबतीत पती मृत्यू दाखल्यासह 31 जुलैपूर्वी संजय गांधी शहर शाखा कार्यालय, जुने जिल्हाधिकारी कार्यालय आवार, सोलापूर येथे द्यावेत.
लाभार्थ्यांची नावे डीबीटी प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यासाठी 31 जुलैपूर्वी कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत. जे लाभार्थी 31 जुलैपूर्वी कागदपत्रे जमा करणार नाहीत, त्या लाभार्थ्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागेल.- शिल्पा पाटील, तहसीलदार, संजय गांधी निराधार योजना