बार्शी : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून तालुक्यातील उपळे दुमाला या गावात अभ्यासाचा भोंगा हा अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला.
गावातील मध्यवर्ती ठिकाणी हा विशेष भोंगा बसविण्यात आलेला आहे. सोशल मीडियाला प्रतिबंध बसावा हा हेतू डोळ्यासमोर ठेवून व मुलांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी हा या उपक्रम सुरू करण्याचा हेतू आहे. अलीकडे सुरू झालेला हा उपक्रम अगदी अल्प काळात संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात लोकप्रिय ठरू पाहत आहे.
मोबाईल गेम्स आणि मालिकांच्या गराड्यात हरवत चाललेल्या पिढीला पुन्हा पुस्तकाकडे वळवण्यासाठी हे अभिनव पाऊल उचलले आहे. अभ्यासाची शिस्त लावण्यासाठी दररोज सायं 7 वाजता व पहाटे 5 वाजता अभ्यासाचा भोंगा वाजवला जातो. 3 जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीपासून हा उपक्रम सुरु केला आहे.दररोज सायं 7 वाजता भोंगा वाजवला की विद्यार्थी , मोबाईल पाहायचा बंद करतात, अभ्यासाला बसतात व 7 ते 9 असा दोन तास अभ्यास करतात.
पहाटे 5 वाजता इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा भोंगा वाजवला जातो. यामुळे विद्यार्थ्यांची डिजिटल टाळेबंदी होऊन अभ्यासाची गोडी लागली. विशेष म्हणजे स्वयं अध्ययनाची सवय त्यांना लागली आहे. दोन वेळेत हा भोंगा संपूर्ण गावात पोहचेल अशा पद्धतीने वाजविला जातो. त्यामुळे साहजिकच गावातील सर्व शाळेतील मुले उठून आपल्या आपल्या अभ्यासाला बसत असल्याचे चित्र दिसून येऊ लागले आहे. उपळे दुमाला या गावचा लोकसंख्याचे प्रमाणात विचार केला असता या गावात 6 हजारांहून अधिक लोक वास्तव्य करतात.अलीकडील काळात मुलांमध्ये सोशल मीडियाचा जो प्रभाव वाढत आहे तो कमी करणे काळाची गरज ठरू पाहत असताना हा उपक्रम सुरू झाला आहे.
यामधील विशेष बाब ही की वेळेवर भोंगा वाजवण्याचे काम गावातील विद्यार्थी आळीपाळीने करतात. त्यामुळे आवाज तयार होताच पालकांना याची चाहूल लागताच मुलांना अभ्यासाला बसण्याची सूचना दिली जाते. या यंत्रणेमुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी, शिस्त लागावी तसेच सोशल मीडियाच्या विळख्यामध्ये अडकलेली लहान मुले, विद्यार्थी यांना बाहेर काढण्यासाठी याचा नक्की उपयोग होत असल्याचे दिसून येत आहे.
गावात भोंगा वाजताच पालक आपल्या घरामध्ये सुरू असलेले टीव्ही, मोबाईल, यासह मनोरंजनात्मक सर्व साधने बंद करून आपल्या घरातील मुलांना अभ्यासपूर्ण वातावरण तयार करून देतात. त्यामुळे साहजिकच सर्वच घरात विद्यार्थी सलग दोन तास अभ्यास सुरु ठेवतात . पहाटे पाच वाजता पुन्हा एकदा भोंगा वाजवला जातो आणि विद्यार्थी पुन्हा उठून अभ्यासाला बसतात. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नियमितता शिस्तबद्धता व अभ्यासाची ओढ वाढत जाते.