सोलापूर : सोलापुरात डीजे बंदी 100 टक्के झाली पाहिजे, यासाठी चळवळ उभी राहिली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी पोलीस प्रशासनाची भूमिका जाहीर केली. सोलापुरात ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. यामुळे डीजे बंदी लढ्यास अधिकचे बळ मिळाले आहे.
दै. ‘पुढारी’ने सोलापुरात डीजे बंदी करण्याची मागणी सर्वात प्रथम सुरू केली. या मागणीला व्यापक पाठिंबा मिळत आहे. डीजेविरोधी कृती समिती, सजग सोलापूरकर समितीने डीजे बंदीसाठी आंदोलने केली. सोलापूरकरांचा डीजे बंदीसाठी जोर वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर शहर पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली.
सोलापुरात गणेशोत्सवात अनेक मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद देत डीजे बंद करण्याचे आश्वासित केले आहे. येणार्या काळात शासनाच्या नियमानुसार साऊंड लावणार्यांनी ध्वनिप्रदूषण होणार नाही, याची काळजी घ्यावी. ध्वनिप्रदूषणाचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी दिला. नागरिकांचा डीजे बंदीसाठी दबाव वाढत आहे. अनेकांनी भेटून डीजे बंद करण्याची मागणी केली आहे. शहरातील काही डॉक्टर, शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता यांच्यासोबत बैठक पार पडली. त्यांनीही डीजेचे दुष्परिणाम सांगितले. त्यानंतर डीजे मालकांची बैठक आम्ही घेतली. त्यांनीही नियमात राहून व्यवसाय करण्याची ग्वाही दिल्याचे एम. राजकुमार यांनी सांगितले. यावेळी पोलीस उपायुक्त विजय कबाडे, गौहर हसन, डॉ. आश्विनी पाटील उपस्थित होते.
कायद्याच्या चौकटीतच साऊंडला परवानगी
आजोबा गणपती येथील लाईट काढ्न घेण्याचा प्रयत्न गैरसमजुतीतून झाला. गणेशोत्सवात संपूर्ण 11 दिवस कायद्याच्या चौकटीत राहून साऊंड लावण्यास परवानगी आहे. शेवटचे तीन दिवस रात्री 12 वाजेपर्यंत साऊंड, लाईट व डेकोरेशनला परवानगी आहे. कोणी मंडपात येऊन साऊंड बंद करा, लाईट बंद करण्यास सांगत असेल, तर पोलिसांशी संपर्क साधा, असे आवाहन एम. राजकुमार यांनी केले.