Pandharpur Accident Pudhari
सोलापूर

Pandharpur Accident: पंढरपूरजवळ पोलीस व्हॅनचा विचित्र अपघात; भाऊ-बहीण गंभीर जखमी

व्हॅनची तीन वाहनांना धडक

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर: न्यायालयात हजर करण्यासाठी ९ आरोपींना घेऊन सोलापूरहून पंढरपूरकडे निघालेल्या पोलीस व्हॅनने तीन वाहनांना जोरदार धडक दिली. या विचित्र अपघातात दुचाकीवरील भाऊ-बहीण गंभीर जखमी झाले असून पोलीस व्हॅनसह दोन कारचा चक्काचूर झाला आहे. हा अपघात शुक्रवारी (दि. २९) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मंगळवेढा-पंढरपूर मार्गावरील एकलासपूर येथे घडला.

यशराज लहू उन्हाळे (वय २१) व प्रगती लहू उन्हाळे (वय १९, दोघे रा. उन्हाळे वस्ती, डोंगरगाव, ता. मंगळवेढा) अशी गंभीर जखमी झालेल्या भावंडांची नावे आहेत. त्यांच्यावर पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात पोलीस व्हॅनचे चालक हवालदार शिवानंद स्वामी (रा. सोलापूर) यांच्याही हात-पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

पंढरपूर येथील उपकारागृह बंद असल्याने शहर व तालुक्यातील विविध गुन्ह्यांतील आरोपींना सोलापूर येथील मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात येते. तेथून न्यायालयाच्या तारखेनुसार आरोपींना पोलीस वाहनातून पंढरपूरला आणले जाते. त्यानुसार, शुक्रवारी सकाळी सोलापूर कारागृहातून ९ आरोपींना घेऊन एक मिनी बस पोलीस व्हॅन मंगळवेढा मार्ग धरून पंढरपूरकडे निघाली होती. व्हॅनमध्ये सुरक्षेसाठी ७ ते ९ पोलीस अंमलदार उपस्थित होते.

दुपारी साडेबाराच्या सुमारास ही वेगवान व्हॅन एकलासपूर गावाजवळ आली असता, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अनियंत्रित झालेल्या या पोलीस व्हॅनने पंढरपूरहून मंगळवेढाकडे जाणाऱ्या यशराज व प्रगती यांच्या दुचाकीला आणि इतर दोन कारना समोरून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकी आणि एका कारचा दर्शनी भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. धडकेनंतर पोलीस व्हॅनचे टायर फुटले आणि ती रस्त्याशेजारील मोकळ्या रानात एका झाडाला धडकून थांबली.

अपघाताचा मोठा आवाज आणि जखमींचा टाहो ऐकून परिसरातील ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दुचाकीवरील गंभीर जखमी भाऊ-बहिणीला वाहनातून बाहेर काढून तातडीने पंढरपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले.

अपघातग्रस्त पोलीस व्हॅनमध्ये काही सराईत गुन्हेगार (आरोपी) असल्याने, अपघाताच्या गोंधळात ते पळून जाण्याची शक्यता होती. ही बाब लक्षात घेऊन व्हॅनमधील पोलिसांनी अपघाताच्या स्थितीतही आरोपींना रोखून धरले. माहिती मिळताच पंढरपूर तालुका पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आरोपींना ताब्यात घेतले. त्यानंतर 'स्वेरी' कॉलेजची बस मागवून सर्व आरोपींना वेळेत न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाच्या कामकाजानंतर त्यांची रवानगी सोलापूर कारागृहात करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी दिली.

अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला करून दोन्ही बाजूंची ठप्प झालेली वाहतूक सुरळीत करण्यात आली. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास पोलीस करत असून, याप्रकरणी रात्री उशिरा पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT