सोलापूर ः अमोल साळुंके
राज्यातील समाजकल्याण आयुक्त, जिल्हा परिषद समाजकल्याण आणि सहायक आयुक्त समाजकल्याण विभागातील जवळपास 21 अधिकार्यांच्या जागा रिक्त आहेत. त्यांचा कारभार प्रभारी अधिकारी देऊन चालविण्यात येत आहे. त्यामुळे राज्याचा समाजकल्याण विभाग प्रभारीवर असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात सहायक आयुक्त समाजकल्याण आणि जिल्हा परिषद समाजकल्याण कार्यालय आहे. यातील वीसपेक्षा जास्त अधिकार्यांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे या विभागाचे कामकाज कासवगतीने होत असल्याचा दावा नागरिकांतून केला जात आहे. राज्यातील सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालयातील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी उपायुक्त पदांच्या दहा जागा रिक्त आहेत. या ठिकाणचा पदभार इतर अधिकार्यांकडे दिला आहे. तसेच सहायक आयुक्तांची सहा पदे रिक्त आहेत. यामध्ये मुंबई शहर, रायगड, बुलडाणा, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे येथील दोन जागा रिक्त आहेत. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील जिल्हा समाजकल्याण अधिकारी या पदाच्या तीन जागा राज्यात रिक्त आहेत. यामध्ये सोलापूर, जालना, बीड या जिल्ह्यांचा समावेश आहे. पुण्याच्या समाजकल्याण आयुक्तालयातील विशेष अधिकारी पदाची एक जागा रिक्त आहे.