सोलापूर : रंगभवन चौकातून दररोज दोन हजाराहून अधिक प्रवाशांची ये जा असते. येथे परिवहन महामंडळाने विना थांब धावणाऱ्या एसटी बससाठी तिकीट विक्री केंद्र सुरू केले. या केंद्रातून दररोज दोन हजार प्रवाशांचे तिकिटाचे बुकिंग केले जाते. सोलापूर ते अक्कलकोट विना थांबा एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे.
यापूर्वी येथे तिकीट एका खोक्यातून विक्री सुरू होती. याविषयी दैनिक ‘पुढारी’ने एसटीची तिकीट विक्री केंद्र रंगभवनला एका पत्र्याच्या खोक्यामध्ये या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन महामंडळाने येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये तिकीट विक्री केंद्र सुरू केले आहे. यामुळे तिकीट विक्री कर्मचारी आणि प्रवाशांचे ऊन, वारा आणि पाऊस यापासून काही प्रमाणात बचाव झाला आहे.
सोलापूर ते अक्कलकोट या मार्गावर परिवहन महामंडळाच्या विना थांबा एसटी बसेस धावतात. या विना थांबा धावणाऱ्या या बसेसमधून पहाटे पाच ते रात्री साधारणतः नऊ या वेळेत दोन हजारांपेक्षा अधिक प्रवाशांची येथून नियमितपणे ये-जा असते. मात्र, या प्रवाशांना तिकीट देणारे महामंडळाचे कर्मचारी हे यापूर्वी पान टपरी वजा खोक्यात तिकीट विक्री करत होते. याविषयी दैनिक पुढारीने एक वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल महामंडळाच्या वरिष्ठ स्तरावरून घेण्यात आली. त्यानंतर महामंडळाच्या विभागीय कार्यालयाच्या प्रशासनाने येथे एक पत्राचे शेड उभारण्यात आले. याच शेडमध्ये तिकीट विक्री केंद्र सुरू केली आहे. या शेडमुळे प्रवाशांचे ऊन, वारा आणि पाऊस यापासून होणाऱ्या त्रासापासून बचाव होणार होईल.
तसेच येथील कर्मचाऱ्यांची यामुळे सोय झाली आहे. यापूर्वी असलेल्या खोक्यात उन्हाळा व पावसाळ्यात येथील एसटीच्या कर्मचाऱ्याला त्रास होत असे. यातून या कर्मचाऱ्यांचीही सुटका झाली आहे. सध्या असलेला निवारा शेड मोठे करणे आवश्यक असून तसे केल्यास एसटीचे वाट पाहणाऱ्या एकाही प्रवाशाला ऊन, वारा व पाऊसाचा त्रास होणार नाही. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून होणाऱ्या प्रयत्नांकडे लक्ष लागून आहे.