सोलापूर : परिवहन महामंडळाच्या विविध सवलत योजनेतून प्रवास करण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड आवश्यक आहे. त्याची नोंदणी करण्याची शेवटची मुदत ही मंगळवार (दि. १) रोजी पर्यंत आहे. शासनाच्या लाडक्या बहिणी, ज्येष्ठ व अमृत ज्येष्ठ नागरिकांना महामंडळाच्या कोणत्याही बसमधून प्रवास करताना सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी हे कार्ड अनिवार्य असणार आहे. या कार्डच्या नोंदणीसाठी शेवटचे तीनच दिवस मुदत राहिलेली आहे.
सवलत योजनेतून शासनाच्या लाडक्या बहिणीसह ज्येष्ठ व अमृत ज्येष्ठ नागरिकांना महामंडळाच्या साध्या बसपासून ते शिवाईपर्यंतच्या सर्वच बसेसमधून प्रवास करताना सवलत योजनेच्या लाभासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार आहे. यापूर्वी या कार्डच्या नोंदणीसाठी ३१ जुलै ही शेवटची मुदत होती. सर्वच महिलांनी या कार्डसाठी नोंदणी केली नसल्याची बाब समोर आली. म्हणून, महामंडळ व शासनाकडून एक सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवली. अद्यापही कार्ड मिळवण्यासाठी महिला व ज्येष्ठ आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांमध्ये उदासीनताच आहे.
कार्डची नोंदणी करताना तांत्रिक समस्या ही उद्भवत आहे. यामुळे एकेका कार्डच्या नोंदणीला जास्त वेळ लागतो. लाडक्या बहिणींसह ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा महामंडळाच्या बसस्थानकातील कार्ड नोंदणी केंद्रात अन्य ठिकाणीही गर्दी दिसते. महिला ज्येष्ठ व अमृत ज्येष्ठ नागरिकांची एनसीएमसी कार्ड साठी नोंदणी राहिली असेल तर त्यांना तीन दिवसात ती करावी लागणार आहे.
कार्डसाठी यंत्रणा दुबळी
१९९ रुपयांच्या एनसीएमसी कार्डसाठी नोंदणी करणाऱ्या यंत्रणेकडून तीनशे ते चारशे रुपयेपर्यंत पैशांची मागणी होत असल्याने नोंदणीसाठी दोनशे रुपये घेऊन गेलेल्या महिला परत येतात. या कारणामुळे सुद्धा कार्डची नोंदणीचे प्रमाण कमी होण्याचे मुख्य कारण आहे.
एकाही केंद्रावर नाही कारवाई
या कार्डसाठी अधिक पैशांची मागणी केलेल्या एकाही केंद्रावर जिल्हा प्रशासन अथवा महामंडळाने कारवाई केल्याची घटना घडली नाही. यामुळे या निगरगट्ट केंद्राच्या चालकांकडून महिला, ज्येष्ठ व अमृत ज्येष्ठ नागरिकांची या कार्डसाठी लूट मोठ्या प्रमाणात होत आहे. ती थांबवण्याची तसदी कोणाकडून घेतली गेली नाही.
प्रशासनाचे दुर्लक्ष
ही लूट शहर-ग्रामीण भागातील महा सेवा केंद्रातील यंत्रणेकडून झाली. यांच्यावर नियंत्रण असलेल्या तालुकास्तरावरील तहसील अथवा जिल्हा प्रशासनाकडून कोणतीच कारवाई झाली नाही. या लूटमारांकडे प्रशासन सोयीस्करपणे दुर्लक्ष करते.