पंढरपूर : पंढरपूर आणि परिसरातील तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढत्या तापमानाचा परिणाम जनजीवनावरही होत आहे. श्री विठ्ठल- रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेले भाविकही हैराण झाले आहेत. तासन्तास रांगेत उभारणाऱ्या भाविकांना उकाड्यापासून दिलासा मिळावा, म्हणून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने दर्शन रांगेत ठराविक ठिकाणी स्प्रिंकलर (तुषार फवारणी यंत्रणा) बसविले आहे. यामुळे नागरिकांना गारवा जाणवत असल्याने अधिक मासात दर्शनासाठी आलेल्या भाविकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या पंढरपुरात श्री विठ्ठल- रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी दररोज हजारो भाविक येतात. सध्या अधिक मास सुरू झाला आहे. या महिन्यानिमित्त विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात भाविकांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे वाढत्या उन्हामुळे तापमानही वाढत आहे. या वाढत्या तापमानाचा दर्शन रांगेत उभारलेल्या भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, याची दक्षता मंदिर समितीने स्प्रिंकलर उभारुन घेतली आहे.
याबाबत सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांना अधिकाधिक सेवा-सुविधा पुरवण्यात येत आहेत.
दरम्यान, गेल्या आठवड्याभरापासून सूर्य आग ओकत आहे. यामुळे तापमानात वरचेवर वाढ होत आहे. यामुळे दर्शन रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. याची दखल विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने घेतली आहे. दर्शन रांगेत उड्डाणपुलाजवळ तुषार फवारणी यंत्रणा बसविली आहे. त्याचबरेबर ठराविक ठिकाणी गरजेनुसार तुषार फवारणी यंत्रणा बसविण्यात आली आहे. यामुळे भाविकांना गारवा जाणवत असल्यामुळे भाविकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
अधिक महिना सुरू असल्यामुळे भाविकांची दर्शनासाठी गर्दी वाढत आहे. वाढत्या गर्दीमुळे भाविकांचे हाल होऊ नयेत म्हणून दर्शन रांगेत स्प्रिंकलर बसविण्यात आले आहेत. तसेच दर्शन रांगेतील भाविकांना पिण्याचे पाणी तसेच लिंबू सरबताचे वाटपही करण्यात येत आहे. याचबरोबर भाविकांना सुलभ व जलद दर्शन मिळावे म्हणून व्हीआयपी दर्शनावर निर्बंध घालण्यात आले आहेत.- राजेंद्र शेळके, कार्यकारी अधिकारी